कीव : रशियाने युक्रेनची राजधानी कीववर पुन्हा हवाई हल्ला केलाय. रशियाने कीवमधील टीव्ही टॉवरवर हवाई हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेनच्या टीव्ही चॅनेलचे प्रसारण बंद झाले. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. ( Five killed in Russian strike on Kyiv TV tower )
Five killed in Russian strike on Kyiv TV tower, reports AFP News Agency quoting official
— ANI (@ANI) March 1, 2022
युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. रशियन सैन्याने युक्रेनमधील कीव आणि खार्किव या दोन प्रमुख शहरांना लक्ष्य केले. रशियाने खार्किव येथील निवासी भागावर मिसाईल हल्ले केले. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय.
युक्रेनवर रशियाचे हल्ले गेले 6 दिवस सुरू आहेत. रशियन सैन्य सतत कीवच्या दिशेने जात आहे. कीव अजूनही युक्रेनच्या ताब्यात आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की त्यांचे सैनिक आणि नागरिक रशियन सैन्याशी लढण्यासाठी तयार आहेत. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या नागरिकांना जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, कीव हे शत्रूंचे मुख्य लक्ष्य आहे. आम्ही त्यांना राजधानीची सुरक्षा मोडू देणार नाही.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी यांनी सांगितले की, रशियन सैन्य उत्तरेकडून पूर्व युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर कीव आणि खार्किवला वेढा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कीववर रशियन सैनिक सतत गोळीबार करत आहेत.
यापूर्वी रशियाने राजधानी कीवमध्ये राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला होता. राजधानीत राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचावे किंवा कीव सोडावे, असे रशियाने म्हटले होते. मंगळवारी रशियाने इशारा दिला की सरकारी इमारतींजवळ राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे.
एवढेच नाही तर कीवमध्ये हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सतत वाजत आहेत. लोकांना आश्रयस्थानी जाण्यास सांगितले जात आहे. जेणेकरून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही.