नवी दिल्ली : जगात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.धक्कादायक बाब म्हणजे या विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांना पुन्हा कोरोना झाल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सुरवातीला अनेक देशांमध्ये योग्य उपचारानंतर रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. याविषयी बरीच संशोधनं केली गेली. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांची चाचणी पुन्हा आठवड्यानंतर पॉझिटिव्ह आल्यास काळजीचे काही कारण नाही असा दावा संशोधकांनी केला आहे.
दक्षिण कोरियाच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं स्पष्ट होत आहे की, उपचारानंतर पुन्हा कोरोना रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्ण्याच्या शरीरात कोरोना व्हायरसचे काही मृत कण असल्याचे सिद्ध होत आहे. परंतु कोरोनाचे हे मृत कण रुग्णाच्या आरोग्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राद्वारे करण्यात आलेल्या संशोधनासाठी २८५ रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांची पीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यानंतर हे सर्व नमुने प्रयोगशाळेत देखरेखीखाली ठेवण्यात आले. पण त्यांच्या वाढ होत नसल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. ज्याने हे सिद्ध केले की कोरोनाचे मृत कण संसर्ग पसरवू शकत नाही.