पंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट

मोदींच्या फोननंतर ट्रम्प यांची पाकिस्तानला तंबी

Updated: Aug 20, 2019, 01:41 PM IST
पंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट title=

वॉशिंग्टन : काश्मीरवरून तणाव निवळावा आणि भारतीय उपखंडात शांतता नांदावी अशी अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भारत पाकिस्तान या दोन देशांनी विविध विषयांवर चर्चेला सुरूवात करावी असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

याआधी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली. काश्मीरच्या मुद्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच ही चर्चा झाली. तसेच द्विपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय संबंधांबाबतही चर्चा झाली.

मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उचलत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखला पाहिजे, असं म्हटलं. दक्षिण आशियातील काही नेत्यांची विधानं भारताविरोधात वातावरण तयार करत असल्याचं सांगत मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नाव न घेता टोला लगावला. दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणासाठी शांतता गरजेची असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलं. गरीबीविरोधात लढण्यासाठी जगातील कोणत्याही देशाला सहकार्य करण्याची भारताची तयारी असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना फोन केल्याचं वृत्त कळताच पाकिस्तानची झोप उडाली. मोदींसोबत चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांना फोन लावला. इम्रान खान आणि त्यांच्या नेत्यांना भडकाऊ भाषण बंद करा म्हणत त्यांनी पाकिस्तानला तंबी दिली.