मुंबई : जगात अनेक अशा जागा आहेत. ज्यांच्यावरुन दोन देशांमध्ये वाद सुरु आहेत. त्या जागांवर दोन्ही देश दावा करतात. तर काही ठिकाणी सामंजस्य दाखवत मार्ग काढला जातो. आज आपण एका अशा जागेबद्दल जाणून घेणार आहोत. जी सहा महिने एका देशाकडे तर पुढचे सहा महिने दुसऱ्या देशाकडे असते. फ्रान्स (France) आणि स्पेनच्या (Spain) सीमेवर हे एक बेट आहे. ज्यावर दोन्ही देश वर्षातील ६-६ महिने सरकार चालवतात.
कोणतेही भांडण नाही, कोणताही वाद नाही. दोन्ही देश या बेटावर 6 महिने राज्य करतात. फिजंट (Pheasant Island) असं या बेटाचे नाव आहे. 1 फेब्रुवारी ते 31 जुलै पर्यंत हे स्पेनच्या नियंत्रणाखाली असते. त्यानंतर ते उर्वरित 6 महिने म्हणजे 1 ऑगस्ट ते 31 जानेवारी पर्यंत फ्रान्सच्या ताब्यात असते. विशेष म्हणजे गेल्या 350 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवरून वाहणाऱ्या बिदासोआ नदीच्या (Bidassoa River) मध्यभागी हे बेट आहे. या बेटावर कोणीही राहत नाही. काही दिवस सोडले तर या बेटावर कोणालाही जाण्याची परवानगी नसते. बेटाच्या दोन्ही बाजूला फ्रेंच आणि स्पॅनिश सैन्ये तैनात असतात.
हे बेट एक अतिशय शांत ठिकाणांपैकी एक आहे, ज्यामध्ये एक ऐतिहासिक वास्तूही बांधली गेली आहे, ज्याचा संबंध 1659 मध्ये घडलेल्या एका घटनेशी आहे. फ्रान्स आणि स्पेनमध्ये या बेटावरून वाद झाला होता. दोन्ही देशांमध्ये सुमारे तीन महिने चर्चा झाली आणि 1659 मध्ये एक करार झाला. याला पाइन्स करार असे नाव देण्यात आले. हा करार शाही विवाहाने पूर्ण झाला.
स्पॅनिश राजा फिलिप चौथा आणि फ्रेंच राजा लुई चौदावा यांच्या मुलीचा हा विवाह होता. आता दोन्ही देश या बेटावर राज्य करतात. एकाच बेटावर दोन्ही देशांच्या राजवटीला कॉन्डोमिनियम म्हणतात.
सॅन सेबॅस्टियन आणि फ्रान्सच्या बायोन या सीमेवरील स्पॅनिश शहराचे नौदल कमांडर बेटाचे कार्यकारी राज्यपाल म्हणून काम करतात. या बेटावर ज्या देशाची सत्ता ६ महिने असते, त्या देशाचे प्रशासन त्यावर लागू होते.
दोन्ही देशांच्या मध्ये वसलेले हे बेट खूपच लहान आहे. हे बेट फक्त 200 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद आहे. हे अत्यंत दुर्मिळ प्रसंगी सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते. बीबीसीच्या माहितीनुसार हे बेट केवळ वृद्ध लोकांसाठी चर्चेचा विषय राहिले आहे, कारण तरुणांना त्याचे ऐतिहासिक महत्त्व समजत नाही.
स्पेन आणि फ्रान्समधील या ऐतिहासिक बेटाबद्दल एकच चिंतेची बाब म्हणजे ते हळूहळू नाहीसे होत आहे. बेटाचा मोठा भाग नदीत जात आहे. असे असूनही दोन्ही देश ते वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत. तसेच दोन्ही देश बेटाच्या बचावासाठी पैसा खर्च करण्यास तयार नाहीत.