Pet Dog Shoots Man: पाळीव कुत्र्याने बंदुकीतून गोळी झाडून केली तरुणाची हत्या

कुत्र्याने बंदुकीवर पाय ठेवल्याने त्यातून गोळी सुटून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अजब घटना समोर आली आहे. तरुण शिकारीसाठी जात असताना ही घटना घडली. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.   

Updated: Jan 25, 2023, 12:19 PM IST
Pet Dog Shoots Man: पाळीव कुत्र्याने बंदुकीतून गोळी झाडून केली तरुणाची हत्या title=
कुत्र्याने बंदुकीतून गोळी झाडून केली हत्या

Pet Dog Shoots Man: अमेरिकेत (USA) एका कुत्र्याने (Pet Dog) बंदुकीतून गोळी झाडून एका 30 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची अजब घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याने अपघाताने मागील सीटवर ठेवलेल्या बंदुकीवर पाय ठेवला आणि त्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी थेट पुढे सीटवर बसलेल्या तरुणाच्या पाठीत लागली आणि मृत्यू झाला.

"कुत्र्याने बंदुकीवर पाय ठेवल्याने त्यातून गोळी झाडली गेली. गोळी लागल्याने जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असून प्राथमिक तपासात ते शिकारीला निघाले होते असं दिसत असल्याचंही पोलीस म्हणाले आहेत. दरम्यान मृत तरुण कुत्र्याचा मालक होता का यासंबंधी तपास सुरु आहे. 

पोलिसांना हत्येचा संशय

पोलिसांना ही हत्या असून दिशाभूल करण्यासाठी कुत्र्याचं नाव घेतलं जात असावं असा संशय आहे. पोलीस याप्रकरणी अधित तपास करत आहेत. मात्र अद्याप त्यांच्या हाती काही पुरावे लागलेले नाहीत. 

मृत तरुण 14 दिवसांपूर्वीच झाला होता बाप

टेलिग्राफच्या वृत्तानुसार, ओजगूर असं या तरुणाचं नाव असून 14 दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं होतं. ओजगूरचे कुत्र्यासोबतचे अनेक फोटो समोर आले आहेत. यामध्ये ते मृत प्राणी, पक्षांसह दिसत आहेत. पण हाच कुत्रा आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरेल याची कल्पना त्याने केली नसेल. 

2018 मध्ये मेक्सिकोतही अशीच घटना घडली होती. शिकारीला गेले असता पाळीव कुत्र्याने चुकून पाठीवर गोळी झाडल्याने मालकाचा मृत्यू झाला होता. 

अमेरिकेत अपघाताने गोळीबार होण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. कायदेशीर परवानगी असल्याने अमेरिकेत बंदूक वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे. US Centers for Disease Control and Prevention ने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये गोळीबाराशी संबंधित घटनांमध्ये 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

 

Tags: