बिश्केक: किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राजनैतिक शिष्टाचाराचा भंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभावेळी हा प्रकार घडला.
या उद्घाटन सोहळ्यात विविध देशांचे प्रमुख येत असताना इतरजण उभे राहून त्यांचे स्वागत करत होते. मात्र, इम्रान खान एकाच जागी ढिम्म बसून राहिले होते. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शांघाय सहकार्य परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना टाळले
या व्हीडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, उद्घाटनस्थळी येणाऱ्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखांचे उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले जात होते. काही राष्ट्रप्रमुख अगोदरच याठिकाणी आले होते. मात्र, इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी सभागृहात प्रवेश केल्यानंतर हे सर्वजण त्यांच्या सन्मानार्थ उभे राहत होते. केवळ इम्रान खान हेच एका बाजूला खुर्चीवर ढिम्मपणे बसून होते.
Prime Minister of #Pakistan @ImranKhanPTI's Arrival with other World Leaders at Invitation of President of Kyrgyzstan for Opening Ceremony 19th Meeting of the Council of the Heads of State of the Shanghai Cooperation Organization in Bishkek Kyrgyzstan (13.06.19)#SCOSummit2019 pic.twitter.com/fYdKYN3Fv7
— PTI (@PTIofficial) June 13, 2019
काही वेळानंतर इम्रान खान यांना आपली चूक लक्षात केली. तेव्हा ते जागेवरून उठलेही. मात्र, तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे इम्रान खान लगेचच पुन्हा खाली बसले.
यापूर्वी सौदी अरेबिया येथील ओआईसी शिखर परिषदेतही इम्रान खान यांनी अशाप्रकारे शिष्टाचारभंग केला होता. यावेळी सौदी अरेबियाचे राजे बिन अब्दुलअजीज यांच्यासोबतच्या बैठकीवेळी त्यांच्या दुभाषाशी इम्रान यांनी बातचीत केली होती. यानंतर राजे बिन अब्दुलअजीज यांचा संदेश भाषांतरित होण्यापूर्वीच इम्रान खान तेथून निघून गेले. त्यावेळीही इम्रान खान यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.