इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रकृती एकदम नाजूक झाली आहे. त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी म्हटले आहे, शरीफ यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून पुढील २४ तासांसाठी त्यांना परदेशात उपचारासाठी नेणे आवश्यक आहे. जर याला उशीर झाल्यास माजी पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार आधी सात अब्ज रुपये जमा करा आणि नंतर जा, असे सांगत असल्याचे वृत्त आहे. एकीकडे नवाज शरीफ यांच्या प्रकृतीबाबतच्या मीडिया रिपोर्टमध्ये अशा बातम्या आहेत, दुसरीकडे, एक्झिट कंट्रोल लिस्टमधून (ईसीएल) त्यांचे नाव हटविण्याबाबत पाकिस्तानमध्ये तीव्र राजकारण सुरू आहे.
नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग-नवाज पक्षाने गुरुवारी सायंकाळी लाहोर उच्च न्यायालचा शरणागती घेतली. त्यानंतर न्यायालयाने नवाझ शरीफ यांना चार आठवड्यांसाठी परदेशात जाण्यास परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेऊन उद्या (शुक्रवार) पर्यंत तहकूब केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयात मुस्लिम लीग-नवाज पक्षातर्फे नवाज शरीफ यांचे नाव ईसीएलमधून बिनशर्त काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या याचिकेला विरोध दर्शवताना सरकारी वकील म्हणाले की, नवाज शरीफ यांना आधीच सोडण्यात आले आहे. हे नाव ईसीएलमधून काढून टाकण्याची अट घालण्याचा सरकारला अधिकार आहे का, असे उच्च न्यायालयाने विचारले. नवाज शरीफ यांना परदेशात उपचारासाठी जायचे आहे का, असे न्यायालयाने विचारले. यावर नवाझ यांच्या वकिलाने सांगितले, हो, परवानगी मिळाल्यास त्यांना जायचे आहे.
भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या नवाज शरीफ यांना आरोग्याच्या आधारे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने म्हटले आहे, त्यांनी जर सुमारे सात अब्ज रुपये (पाकिस्तानी) रोख्यांमध्ये जमा करून ते परदेशात जाऊ शकतात. यावर मुस्लिम लीग-नवाज पक्षाकडून याला आक्षेप घेण्यात आला असून ही रक्कम एक प्रकारे बेकायदेशीर आहे आणि नवाज ही अट स्वीकारणार नाहीत. त्यांना परदेशात उपचारासाठी जाण्याची बिनशर्त परवानगी मिळते.