सिद्धूंची मेहनत फळाला आली, 'गुरुनानक' पुण्यतिथीला पाककडून 'अनोखी' भेट

'झप्पीशी याचा काहीही संबंध नाही ही तर बाबांची कृपा आहे'

Updated: Sep 7, 2018, 01:02 PM IST
सिद्धूंची मेहनत फळाला आली, 'गुरुनानक' पुण्यतिथीला पाककडून 'अनोखी' भेट  title=

नवी दिल्ली : पाकिस्ताननं करतारपूर कॉरिडोर उघडण्याचा निर्णय घेतलाय. कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धु यांची मेहनत फळाला आलीय असंच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या शपथग्रहण सोहळ्याला सिद्धू यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर लष्करप्रमुखांना मारलेल्या मिठीनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. परंतु, आता मात्र या बातमीनं अनेकांना दिलासा मिळालाय. शीख समाजाकडून प्रदीर्घ काळापासून करतारपूर प्रवेशाची मागणी केली जात होती. 

या निर्णयावर सिद्धू म्हणतात... 

पाकिस्तानच्या या निर्णयावर सिद्धूंनी आपली भावना व्यक्त करताना 'माझा मित्र इमरान खाननं माझं जीवन सफल केलं' अशी प्रतिक्रिया दिलीय. लाखो श्रद्धाळुंची इच्छा पूर्ण होतेय. राजकारणाला गुरुघरापासून दूर ठेवा. या निर्णयामुळे दरी दूर होईल. बाबांनी लोकांची मागणी ऐकलीय... झप्पीशी याचा काहीही संबंध नाही ही तर बाबांची कृपा आहे, असं म्हणत सिद्धू यांनी या निर्णयासाठी लोकांना शुभेच्छाही दिल्यात.

गुरुनानक पुण्यतिथीचा मुहूर्त

22 सप्टेंबर रोजी शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांची 550 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. याच मुहूर्तावर करतारपूर कॉरीडोर उघडण्यात येणार आहे. 22 सप्टेंबर 1539 रोजी गुरुनानक यांचा मृत्यू करतारपूरमध्ये झाला होता. त्यामुळे या हीच तारीख निर्धारित करण्यात आलीय. करतारपूरमध्येच गुरुनानक साहेबांचं समाधीस्थळ आहे. हे ठिकाण 'करतारपूर साहिब' म्हणून ओळखलं जातं.