'इम्रान खान माझ्या गैरहजेरीत घरी यायचे, नंतर अध्यात्माच्या नावाखाली रात्रभर बायकोसह...'; बुशरा बीवीच्या पतीचे गंभीर आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने अनेक गंभीर आरोप केले असून कोर्टात केस दाखल केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 26, 2023, 01:15 PM IST
'इम्रान खान माझ्या गैरहजेरीत घरी यायचे, नंतर अध्यात्माच्या नावाखाली रात्रभर बायकोसह...'; बुशरा बीवीच्या पतीचे गंभीर आरोप title=

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते आपली पत्नी बुशरा बीबीमुळे चर्चेत असून, नव्या वादात अडकले आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचा पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेक यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खावर यांनी इम्रान खान आणि बुशरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान मी घरी नसताना अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि कित्येक तास वेळ घालवत असत असा आरोप खावरने केले आहेत. इम्रान खान यांच्यामुळेच आपलं लग्न तुटल्याचं त्याचं म्हणणं आहे. 

खावर फरीद यांनी 71 वर्षीय इम्रान खान आणि 49 वर्षीय बुशरा यांच्याविरोधात पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 34 (सामान्य हेतू), कलम 496 (वैध विवाहाशिवाय फसवणुकीने निकाह करणे) आणि 496-बी (व्यभिचार) अंतर्गत इस्लामाबाद पूर्व येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश कुदारतुल्ला यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.  

डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सुनावणीदरम्यान खावर फरीद यांनी आपला जबाब नोंदवला आहे. खावर यांना नुकतंच एका भ्रष्टाचार प्रकरणी जामीन मिळाला आहे. जबाब नोंदवताना त्यांनी पुन्हा एकदा इम्रान खान यांच्यामुळे आपलं लग्न तुटल्याचा आरोप केला. 

कोर्टाने तिघांना पाठवली नोटीस

यानंतर कोर्टाने तीन साक्षीदार इस्तेखाम-ए-पाकिस्तान पक्षाचे सदस्य अवन चौधरी, मुफ्ती मोहम्मद सईद आमि लतीफ यांना नोटीस जारी केली. या तिघांनाही 28 नोव्हेंबरला कोर्टात हजर होण्याचा आदेश देण्यात आला आहे. अवन आणि सईद यांनी हा निकाह लावला होता. तसंच लतीफ हा खावर यांच्या घरी कर्मचारी होता. 

खावर यांनी कोर्टात आग्रह केला आहे की, इम्रान आणि बुशरा यांना कायद्याप्रमाणे बोलावलं जावं आणि कडक शिक्षा दिली जावी. ते म्हणाले की, माझ्या गैरहजेरीत इम्रान खान नेहमी अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि तासनतास वेळ घालवत असतं, जे अनैतिक होतं. 

इम्रान खान रात्री उशिरा बुशराला फोन करायचे. यासाठी त्यांनी बुशराला वेगळा फोन नंबर आणि मोबाइल दिला होती असाही त्यांचा आरोप आहे. 

खावर म्हणाले आहेत की, 14 नोव्हेंबर 2017 रोजी बुशरासह तलाक झाला होता. इम्रान आणि बुशरा यांनी व्यभिचाराचा गुन्हा केला आहे. दोघांनी 1 जानेवारी 2018 रोजी निकाह केला. इम्रान खान यांनीच आपलं लग्न मोडलं आणि नंतर माझ्या पत्नीशी लग्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. आपलं लग्न अगदी सुरळीत होतं, पण इम्रान खान यांच्यामुळे मोडलं असं त्यांचं म्हणणं आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफने हे आरोप फेटाळले आहेत.