Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज

Pakistan Crisis :  पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे. मोठे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2023, 01:43 PM IST
Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज title=

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे.कारण तीन वर्षात 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. पाकिस्तान संकटाच्या खोल दरीत अडकला आहे. तसेच शेहबाज शरीफ यांचे सरकार आणि पाकिस्तानची न्यायव्यवस्था यांच्यातील संघर्ष आता वाढला आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान दिवाळखोरीबाबत काउंटडाऊन सुरु झाले आहे.  पाकिस्तानकडे काही दिवस उरले आहेत. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या संकटाशी लढण्यासाठी पाकिस्तानच्या हातात काहीही नाही. त्यामुळे दिवाळखोरीपासून कोणीही वाचवू शकत नाही, अशी स्थिती आहे.

कर्ज फेडण्याचे मोठे टेन्शन 

 पाकिस्तान त्याच्या सर्वात वाईट आर्थिक टप्प्यातून जात आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पाकिस्तानची अवस्था एकदम बिकट आहे. आता तेथील 90 टक्के लोकांनी हॉटेलमध्ये खाणे बंद केले आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानमध्ये हालाक्याची परिस्थिती झाली आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेक देशांकडून कर्ज घेतले आहे, परंतु आजपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा नाही. पाकिस्तानमध्ये महागाईचा सर्वाधिक फटका तेथील गरीब जनतेवर दिसून येत आहे. तसेच कर्ज फेडण्याचे मोठे टेन्शन आहे.

पाकिस्तानची गुलामीच्या दिशेने वाटचाल

आता पाकिस्तानने एक जरी चूक केली तर त्याची गुलामीच्या दिशेने वाटचाल निश्चित आहे, हे जगाला कळून चुकले आहे. युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस या अमेरिकन थिंक टँकने पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्याचे कारणही दिले आहे. अहवालात सांगण्यात आले आहे की, एप्रिल 2023 ते जून 2026 दरम्यान पाकिस्तानला 77.5 अब्ज डॉलरचे कर्ज फेडायचे आहे. हे कर्ज तीन वर्षात फेडायचे आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तानला इतके डॉलर्सची कोणताही देश मदत करेल, याबाबत शंका आहे. सध्या सौदी अरेबिया आणि चीनसारखे देश पाकिस्तानला 1 ते 2 अब्ज डॉलर्सची मदत करत आहेत, पण पाकिस्तान फार काळ तग धरु शकणार नाही, हे बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीवरुन दिसून येत आहे.

खायला मिळत नसल्याने लूटमार, मारामारीच्या घटना

पाकिस्तानात अन्न-धान्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहेत. पाकिस्तानकडे दुसऱ्या देशातून ते आयात करण्यासाठी पैसेच नाहीत. पाकिस्तानातील कामगार वर्ग हा धान्यावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. मोफत पीठ वाटप करण्यासाठी देशभरातील पीठ वितरण केंद्रांवर लाखो लोक गर्दी करत आहेत. या केंद्रांवर सर्वजण अगोदरच रांगा लावतात, मात्र महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे या केंद्रांवर लूटमार, मारामारीच्या घटना समोर येत आहेत. नुकतेच मोफत वितरणादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 16 जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, याआधीही मोफत मिळाणाऱ्या पीठासाठी अनेक ठिकाणी लुटमारीचे प्रकार घडले आहेत.