इस्लामाबाद : भारताच्या काश्मीरबाबतच्या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरलं आहे. त्यातच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अण्वस्त्र वापराबाबत इशारा दिला. त्यामुळे पाकिस्तान आणखी चवताळलं आहे. युद्धजन्य स्थितीला सामोरं जाण्यास सज्ज असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. भारत हल्ला करण्याच्या तयारीत असेल, तर आम्हीही तयार आहोत, अशी दर्पोक्ती पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी केली आहे.
यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी उपस्थित होते. अण्वस्त्रांबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं विधानही पाकिस्तानला झोंबलं आहे. भारताचे संरक्षणमंत्री बेजबाबदारपणे बोलत असल्याचं कुरेशी म्हणाले.
अण्वस्त्राचा आपणहून पहिले वापर करणार नसल्याच्या तत्वाशी भारत आतापर्यंत कटिबद्ध राहिला आहे. मात्र भविष्यात परिस्थिती पाहून याबाबतचा विचार केला जाईल, असं राजनाथ सिंग म्हणाले होते. यानंतर आसिफ गफूर आणि शाह मेहमूद कुरेशी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला. आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, असं राजनाथ सिंग म्हणाले. हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जन आशीर्वाद यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी राजनाथ सिंह बोलत होते.