2 टीम, 15 किलोमीटर आणि 56 तास, अफगाणिस्तानमधून असा रंगला भारतीयांच्या सुटकेचा थरार

काबूलमधील भारतीय दूतावासापासून काही मीटर अंतरावर स्फोटांचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता अधिक वाढली

Updated: Aug 18, 2021, 10:21 PM IST
2 टीम, 15 किलोमीटर आणि 56 तास, अफगाणिस्तानमधून असा रंगला भारतीयांच्या सुटकेचा थरार title=

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार परतलं आहे. 20 वर्षांपूर्वीची भयानक परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये पुन्हा दिसू लागली आहे. तालिबान्यांचा क्रुर चेहरा हळूहळू समोर येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचं मिशन सुरु करण्यात आलं.

सूत्रांच्या माहितीनुसार 15 ऑगस्टच्या आधीपासून 'ऑपरेशन एअरलिफ्ट'ची तयारी सुर करण्यात आली होती. 15 ऑगस्टला काबूलमधील भारतीय दूतावासापासून सुमारे 70 मीटर अंतरावर स्फोटांचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता अधिक वाढली.

दोन टीम तयार करण्यात आल्या

काबूलमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. एका टीममध्ये 46 लोक होते. त्यांना 16 ऑगस्टला आणण्यात आलं. त्याचवेळी, दुसऱ्या टीममध्ये भारताचे राजदूत, 99 आयटीबीपी कमांडो, तीन महिला आणि दूतावास कर्मचारी यांचा समावेश होता. 17 ऑगस्ट रोजी सुमारे 150 लोकांना भारतात आणण्यात आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधून भारतीयांना बाहेर काढण्याचा पहिला प्रयत्न 15 ऑगस्टला करण्यात आला, भारतीय नागरिक विमानतळाकडे रवाना झाले, पण ते विमानतळापर्यंत पोहोचू शकले नाहीत. कारण चेक पॉइंटवर काही सशस्त्र तालिबानी दिसले, ज्यामुळे या टीमला 15 तारखेला दूतावासात परत यावं लागल.

16 ऑगस्टला पुन्हा प्रयत्न करण्यात आला. भारतीय नागरिक दुपारी 4 वाजता काबूल विमानतळाकडे निघाले, पण दुतावासबाहेरच काही तालिबानी शस्त्र घेऊन उभे होते. अशा परिस्थितीत विमानतळापर्यंतच 15 किलोमीटरचं अंतर कापण्याचं मोठं आव्हान होतं.

असा दिला चकवा

काहीही करुन विमानतळापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरु होते. रात्री 10.30 वाजता टीम पुन्हा विमानतळाच्या दिशेने रवाना झाली. सशस्त्र तालिबान्यांना चकवा देत रात्री 3.30 वाजता भारतीय विमानतळावर पोहचले. यादरम्यान रस्त्यांवर लोकांची मोठी गर्दी होती. तालिबान्यांकडून प्रत्येक किलोमीटरवर बॅरिकेड लावून तपासणी केली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासातून विमानतळावर भारतीयांना सुरक्षितपणे नेण्यासाठी सुमारे 14 बुलेटप्रूफ कारच्या ताफ्याचा वापर करण्यात आला.

56 तास कोणी झोपलं नाही

अखेर C-17 विमानाने सकाळी 5.30 वाजता काबूल विमानतळावरुन उड्डाण केलं आणि 11.15 वाजता गुजरातमध्ये दाखल झालं. तेथे भारतीयांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. 56 तासांच्या या संपूर्ण घटनेदरम्यान कोणीही झोपले नाही, कोणी अन्नाचा कणही खाल्ला नाही. सध्या अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावास बंद आहे.