सोल : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याची छोटी बहिण किम यो जोंग पुन्हा एकदा एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसलीय. प्योंगयांगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका खेळाच्या मैदानात तब्बल ५० दिवसांनंतर किमची बहिण सार्वजनिकरित्या दिसली. किमच्या बहिणीचं सार्वजनिकरित्या अशा पद्धतीनं दिसणं चर्चेचं कारण ठरलं त्यालाही एक कारण आहे... ते म्हणजे, वॉशिंग्टनसोबत परमाणु शिखर वार्ता अपयशी ठरल्यानंतर किम यो जोंग हिला श्रमाची शिक्षा देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. तसंच किम योंग हिला तिच्या भावानं अर्थात किम जोंगनं सार्वजनिक जीवनातून दूर राहण्याचे आदेश दिल्याचं मीडियातून सांगितलं गेलं होतं. परंतु, किम यो जोंग सार्वजनिकरित्या दिसल्यानंतर मीडियाच्या या बातम्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे.
उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियानं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार आणि व्हिडिओनुसार, जोंग आपला भाऊ किम जोंग, भावाची पत्नी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्योंगयांगच्या स्टेडियममध्ये बसून खेळाचा आणि सांगितिक कार्यक्रमांचा आनंद घेत टाळ्या वाजवताना दिसली.
उत्तर कोरियाचे अधिकारी किम योंग चोल यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावल्याचं इथल्या सरकारी मीडियानं म्हटलं.