सोल : राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला कुत्र्याच्या भुंकण्यची उपमा देत उत्तर कोरियाने अमेरिकेवर पलटवार केला आहे. उत्तर कोरिया अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही, असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.
उत्तर कोरियाल इशारा देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, अमेरिकेच्या सहयोगी देशांवर जर हल्ला झाला तर, तो हल्ला करणाऱ्या देशाला अमेरिका बर्बाद करेन. संयुक्त राष्ट्रांच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ट्रम्प यांनी हा इशारा दिला होता.
दरम्यान, उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग-हो हे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. दरम्यान, पत्रकारांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्याबाबत री योंग-हो यांना प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना एका म्हणीचा आधार घेत री योंग-हो यांनी हे विधान केले. ते म्हणाले, 'रस्त्याने हत्ती चाले आपली चाल कुत्रे भुंकती हजार'. अमेरिका जर धमकीच्या आधारावर आम्हाला घाबरवू इच्छित असेल तर, तो नक्कीच स्वप्न पाहात आहे.
जगात एकटे पडलेल्या आणि आर्थिक संकटात असलेल्या उत्तर कोरियाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या आक्रमकतेला आवर घालण्यासाठी आम्हाला अण्वस्त्रांची आवश्यकता आहे. अमेरिकेच्या मुख्य भूभागापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अण्वस्त्रांची निर्मीत करण्याचे उत्तर कोरियाचे लक्ष आहे. दरम्यान, अलिकडील काही दिवसात अण्वस्त्रांची निर्मिती करण्याची उत्तर कोरियाची मोहिम अधिक तीव्र झाली आहे.