नीरव मोदीची स्विस बँकेतील 4 खाते गोठवली, इतके कोटी होते जमा

नीरव मोदीला जोरदार धक्का...

Updated: Jun 27, 2019, 02:05 PM IST
नीरव मोदीची स्विस बँकेतील 4 खाते गोठवली, इतके कोटी होते जमा title=

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवणारा मुख्य आरोपी आणि भारतातून पळून गेलेला नीरव मोदी याला जोरदार धक्का बसला आहे. नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीचे 4 बँक अकाऊंट स्विट्ज़रलँडमध्ये सीज करण्यात आले आहेत. नीरव  आणि पूर्वी मोदीच्या खात्यात जवळपास 283.16 कोटी रुपये जमा होते. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेचे जवळपास 13 हजार कोटी बुडवले आहेत.

स्विस बँकेने देखील याबाबत एक पत्रक काढून माहिती दिली आहे की, भारत सरकारच्या मागणीनंतर त्यांनी नीरव आणि पूर्वी मोदीचे 4 खाते सीज केले आहेत.

या प्रकरणात भारत सरकारला दुसरं मोठं यश मिळालं आहे. दुसरीकडे बुधवारी दुसरा आरोपी मेहुल चोकसीला ही भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एंटिगुआचे पंतप्रधानांनी म्हटलं की, आम्ही मेहुल चोकसीचं नागरिकत्व रद्द करत आहोत. त्यामुळे त्याच्याकडे वाचण्यासाठी कोणताही कायदेशीर पर्याय नसणार आहे.

नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. तो न्यायालयीन कोठडीत असून आतापर्यंत 4 वेळा त्याचा जामीन अर्ज कोर्टाने नाकारला आहे. 

फेब्रुवारी 2018 मध्ये पीएनबी घोटाळा समोर आला होता. तेव्हापासून नीरव मोदी फरार आहे. भारतीय यंत्रणांनी आतापर्यंत त्याची करोडो रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पण आता परदेशातील संपत्तीही जप्त होण्यास सुरुवात झाली आहे.

19 मार्चला नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाली होती. भारतीय यंत्रणा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ब्रिटेन सरकारसोबत चर्चा सुरु आहे. सीबीआय आणि ईडी नीरव मोदीच्या प्रकरणात तपास करत आहेत.