'नग्नता म्हणजे सौंदर्य नाही, आमच्याकडे नग्नता..'; जाहीर भाषणात 'तिने' ब्रिटीश राजघराण्याला सुनावलं

First Lady Slams Meghan Markle: ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य असलेल्या मेगन आणि हॅरी यांनी काही दिवसांपूर्वीच या देशाचा दौरा केला होता. हे दोघेही तीन दिवस या देशात वास्तव्यास होते. मात्र आता या देशातील प्रथम महिलेने मेगन यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 29, 2024, 12:56 PM IST
'नग्नता म्हणजे सौंदर्य नाही, आमच्याकडे नग्नता..'; जाहीर भाषणात 'तिने' ब्रिटीश राजघराण्याला सुनावलं title=
जाहीर भाषणामध्ये केलं हे विधान

First Lady Slams Meghan Markle: नायजेरियाच्या प्रथम महिला सिनेटर ओलुरेमी टिनुबू यांनी ब्रिटीश राज घरण्यातील सदस्या असलेल्या मेगन मार्कल यांच्यावर निशाणा साधला आहे. महिलांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी उत्तम योगदान दिलेल्यांच्या सन्मानर्थ आयोजित 'सेलिब्रेटिंग द वुमन' नावाच्या कार्यक्रमातील आपल्या भाषणामध्ये टिनुबू यांनी अप्रत्यक्षपणे नुकत्याच नायजेरियात येऊन गेलेल्या मार्कल यांचा संदर्भ देत टोला लगावला. 

मेगन आणि हॅरी दोघांवरही टीका

मेगन आणि प्रिन्स हॅरी हे नुकतेच नायजेरियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावरुन परतल्या आहेत. मात्र या दौऱ्यामदरम्यान ड्यूक म्हणजेच हॅरी आणि डचेस ऑफ ससेक्सेस म्हणजेच मेगन हे वेगवेगळ्या कारणांमुळे टीकेचे धनी ठरले आहेत. अनेक समीक्षकांनी मेगनला तिच्या ड्रेसिंगवरुन लक्ष्य केलं. नायजेरियासारख्या देशात मेगन यांच्या कपड्यांची निवड चुकली. त्यांची कपडे अंगप्रदर्शन करणारे होते अशी टीका झाली. तर दुसरीकडे हॅरी यांनी किंग चार्ल्सला यांच्याशी दगाफटका केल्याचा विषय या दौऱ्यादरम्यान नायजेरियातील लोकांमध्ये चर्चेचा विषय होता.

1 कोटी 27 लाखांची शॉपिंग

दौऱ्यावरुन परतल्यानंतर मेगन यांनी हा दौरा अविस्मरणीय होता असं म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये मेगन आणि हॅरी यांनी नायजेरियामधील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर नेते मंडळी, मान्यवर आणि स्थानिकांची भेट घेतली. या दौऱ्यासाठी मेगन यांनी 1 लाख 20 हजार ब्रिटीश पौंड म्हणजेच भारतीय चलानानुसार 1 कोटी 27 लाख रुपयांचे विशेष दागिने आणि कपड्यांची खरेदी केली होती. मेगन यांनी एवढा खर्च करुन वेगळे लूक या दौऱ्यात ट्राय केले. मात्र त्यानंतरही नायजेरियन अध्यक्षांच्या पत्नी ओलुरेमी टिनुबू यांना मेगन यांचा लूक फारसा आवडलेला दिसत नाही.

नग्नतेचा उल्लेख करत काय म्हणाल्या?

पती बोला टिनुबू यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ओलुरेमी टिनुबू यांनी भाषण केलं. आपण योग्य काळजी घेतली नाही तर देशातील तरुण त्यांची मूळ ओळख विसरुन जातील अशी चिंता त्यांनी भाषणात व्यक्त केली. अॅरीज न्यूजवर हे भाषण लाइव्ह दाखवण्यात आलं. त्यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ओलुरेमी टिनुबू यांनी, "आपल्याकडे मीट गाला नसतो. नग्नता सध्या सगळीकडे दिसून येते. मात्र पुरुष पूर्ण कपड्यांमध्ये दिसतात. त्यामुळे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यांना आपलं सांगितलं पाहिजे की आमच्या संस्कृतीत नग्नता स्वीकारली जात नाही. नग्नता म्हणजे सौंदर्य नाही. हे अजिबात चांगलं नाही," असं म्हटलं.

मेगन आफ्रिकेत का आली होती?

महिला आणि पुरुषांनी आपण कोण आहेत याचं भान बाळगलं पाहिजे अशी अपेक्षा ओलुरेमी टिनुबू यांनी व्यक्त केली. अमेरिकी चित्रपट कलाकारांची नायजेरियन तरुणांनी नक्कल करण्याची गरज नाही असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. "त्यांना कल्पना नाही की ते कुठून आले आहेत. मेगन इथे आफ्रिका पाहण्यासाठी का आली होती? आपण कोण आहोत याची आपल्याला कल्पना आहे. तुम्ही स्वत:ची ओळख विसरु नका," असं ओलुरेमी टिनुबू म्हणाल्या. "ते आपण नायजेरियन असून आपली संस्कृती सुंदर असल्याचं विसरत आहेत," असं म्हणत ओलुरेमी टिनुबू यांनी तरुणांना कपड्यासंदर्भातील समज देण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. 

अनेकांनी मेगन यांच्यावर साधला निशाणा

ओलुरेमी टिनुबू यांच्या टीकेनंतर सोशल मीडियावर ब्रिटीश राज घरण्याच्या चाहत्यांनी मेगन यांच्यावर निशाणा साधला आहे. "मेगन मार्कलने अंतरराष्ट्रीय स्तरावरील गोंधळ घालून ठेवला. आम्ही तिला कपड्यांबद्दल आधीच इशारा दिला होता," असं एका चाहत्याने म्हटलं आहे. 

मुलांसमोर असे कपडे परिधान करणं चूक

अन्य एकाने, "नायजेरियाच्या प्रथम महिला असलेल्या ओलुरेमी टिनुबू यांनी पाहुण्यांनी त्यांच्या देशाचा, लोकांचा आणि संस्कृतीचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्याचं अधोरेखित केलं हे बरं झालं. अशाप्रकारचे कपडे परिधान करणं हा अपमानच आहे. त्यातून असे कपडे मुलांच्या उपस्थितीत परिधान करणे चुकीचं आहे. हा मेगन आणि हॅरी यांच्या वागण्याचा पॅटर्नच आहे. त्यांनी जाहिरातबाजीसाठी नायजेरिया आणि आफ्रिकेचा वापर थांबवला पाहिजे," असा टोला लगावला आहे. मात्र दुसरीकडे मेगन यांच्या समर्थकांनी हा काही वादाचा विषय असू शकत नाही असं म्हटलं आहे.