नवी दिल्ली : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यानंतर आता नव्या कोरोनाची दहशत संपूर्ण जगात पसरताना दिसत आहे. दरम्यान दक्षिण अफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्यानंतर पाच देशांनी दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. नव्या कोरोनाची वाढती दहशत लक्षात घेवून या पाच देशांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. ब्रिटेननंतर अफ्रिकेत नव्या कोरोनाचा स्ट्रेन आढळला आहे. नव्या कोरोनाच्या (New Corona Virus) रुपामुळे आणखी सर्वच देशांची चिंता वाढवली आहे
जर्मनी, तुर्की, इस्रायल, स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया या देशांनी दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या उड्डणांवर बंदी घातली आहे. सर्वप्रथम जर्मनीने उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कोरोनाचा स्ट्रेन मिळाल्यानंतर सरकारने ग्रेट ब्रिटेन आणि दक्षिण अफ्रिकेच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया जर्मनीच्या अधिकृत प्रवक्ते मार्टिना फियाट यांनी दिली आहे.
दक्षिण अफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तर मृतांच्या संख्येतही भर पडत आहे. त्याचबरोबर नव्या कोरोनाचा स्ट्रेन मिळाल्यानंतर नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय दक्षिण अफ्रिकेतील नवा कोरोना ब्रिटेनमधील नव्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे.
दरम्यान, कोरोनामुळे (Covid-19) जगभरात आतापर्यंत ७ करोड ७७ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत १७ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, आता ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाच्या (New Corona Virus) रुपामुळे आणखी चिंता वाढवली आहे.