...म्हणून नासाकडून होतंय इस्रोचं कौतुक

'चांद्रयान २' मोहिमेविषयी नासा म्हणतंय.....

Updated: Sep 8, 2019, 07:54 AM IST
...म्हणून नासाकडून होतंय इस्रोचं कौतुक title=
...म्हणून नासाकडून होतंय इस्रोचं कौतुक

मुंबई : 'चांद्रयान २' मोहिमेविषयी सर्वच स्तरांतून इस्त्रोचं कौतुक होत असतानाच आता नासाकडूनही त्यांच्या कामगिरीचं तोंड भरुन कौतुक करण्यात आलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या कामगिरीमुळे आम्हालाही प्रेरणा मिळाल्याचं नासाकडून म्हटलं जात आहे. 

सौर प्रणाली नेमकी कशी काम करते याविषयीच्या संशोधनासाठी येत्या काळात इस्रोसोबत काम करण्याची इच्छाही नासाकडून व्यक्त करण्यात आली. 'अंतराळ काही सोपं नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरवण्याच्या चांद्रयान २ मोहिमेच्या प्रयत्नांसाठी आम्ही इस्रोचं कौतुक करतो. तुमच्या आतापर्यंतच्या या प्रवासातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. येत्या काळात संधी मिळाल्यास सौर प्रणाली कशी काम करते यावर एकत्रितरित्या काम करु अशी आशा आहे.....', असं ट्विट नासाकडून करण्यात आलं. 

शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास चंद्रावर लँड होण्याच्या अवघ्या काही तास आधीच विक्रम लँडरशी संपर्क तुटला आणि इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांसह या मोहिमेकडे नजर लावून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. पण, यातही इस्रोच्या कामगिरीची दाद द्यायला मात्र कोणीही विसरलं नाही. इस्रो प्रमुख के. सिवन यांनीच याविषयीची माहिती दिली. शिवाय, विक्रम लँडरशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्याचा प्रयत्न पुढील १४ दिवस सुरुच राहिल असंही ते म्हणाले. सोबतच चांद्रयान २ मोहिमेतील ऑर्बिटरचं आयुर्मान हे एका वर्षावरुन सात वर्षांपर्यंत वाढलं आहे अशी महत्त्वाची माहितीसुद्धा त्यांनी दिली. त्यामुळे अद्यापही या मोहिमेच्या आशा कायम आहेत, असंच म्हणावं लागेल.