नवी दिल्ली : चॉकलेट कोणाला आवडत नाही? अशी व्यक्ती दुर्मिळच असेल. जगात विविध प्रकारची चॉकलेट्स आहेत. यात काही स्वस्त तर काही महाग असतात. पण महाग म्हणजे किती महाग? एका चॉकलेटची किंमत हजारो युरो असले अशी तुम्ही कधी कल्पना तरी केली आहे का? पण हे खरे आहे.
या चॉकलेटचे पॅकींग एखाद्या दागिन्याप्रमाणे आहे. याच्या सुरक्षिततेसाठी चक्क सुरक्षारक्षक असतात. मजेदार गोष्ट ही की या चॉकलेटवर २३ कॅरेट गोल्डचे पॉलिश केले आहे. २३ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान पोर्तुगालच्या ओबिडोसमधील एका फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हे चॉकलेट पाहायला मिळाले. हे जगातील सर्वात महागडे चॉकलेट असून याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही सामिल करण्यात आले आहे.
या इंटरनॅशनल चॉकलेट फेस्टिवल ऑफ ओबिडोसमध्ये हे अद्भूत चॉकलेट पाहायला मिळाले. या चॉकलेटची किंमत ७७२८ युरो म्हणजेच ६ लाख १८ हजार ४०० रुपये आहे.
बोनबोन चॉकलेटिअर डेनिअल गोम्सने सांगितले की, यात सर्वात महागडी सामुग्री वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर हे चॉकलेट बनवण्यासाठी सुमारे वर्षभराचा कालावधी लागला. या चॉकलेटला ग्लोरियस असे नाव देण्यात आले आहे. या चॉकलेटचे १००० पीस (तुकडे) बनवण्यात आले आहेत. हे चॉकलेट हिऱ्याप्रमाणे दिसत असून याच्या चवीची अनेकांनी स्तुती केली. चॉकलेटचे पॅकिंग काही खास असून याच्या पॅकिंगमधेय सोन्याच्या रिबनचे एक हॅंडल असेल. त्याचबरोबर यावर क्रिस्टल आणि मोत्यांनी नाव लिहिले आहे. अरब, रशिया, अंगोला आणि अर्जेंटीना या देशात या चॉकलेटची निर्यात होईल.