ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसची दहशत, पुन्हा कडक लॉकडाऊन लागू

कोरोना विषाणूच्या नवीन विषाणुमुळे ब्रिटन संकटात

Updated: Jan 5, 2021, 10:21 AM IST
ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसची दहशत, पुन्हा कडक लॉकडाऊन लागू title=

लंडन : कोरोना विषाणूच्या नवीन विषाणुमुळे ब्रिटन संकटात सापडले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर देशात नवीन लॉकडाऊन जाहीर केले. कोरोनाच्या नवीन प्रकाराचा धोका लक्षात घेता पुन्हा देशात लॉकडाउन लावण्यात आले आहे. मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर ब्रिटीश सरकारने पुन्हा लॉकडाऊनच्या तरतुदी देशात लागू करण्याची घोषणा केली. जॉन्सन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, कोरोनाच्या नवीन प्रकारानंतर काही आठवड्यांपूर्वी इंग्लंडमध्ये कठोर नियम जाहीर केले. ब्रिटन सरकारच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या नवीन रूपांच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि त्याला एक धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. यूकेमध्ये, नवीन विषाणुमुळे मृत्यूचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढलं आहे.

पंतप्रधान जॉन्सन म्हणाले की, व्हायरसने आपल्या हल्ल्याचा मार्ग बदलला आहे, अशा परिस्थितीत आपणही सावध व सतर्क असले पाहिजे. याचा सामना करण्यासाठी आम्हाला आपली संरक्षण पद्धत बदलण्याची गरज आहे. कोरोनाचा नवा प्रकार देशात वेगाने पसरत आहे याची आम्हाला माहिती आहे. 60 टक्के पेक्षा जास्त लोकं लंडनमध्ये नवीन व्हायरसच्या संपर्कात आले आहेत.

पंतप्रधान जॉनसन म्हणाले की, सुमारे ५.६ कोटी लोकं लॉकडाऊनमध्ये येतील. देशात लागू असलेले नवीन लॉकडाउन बहुदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहिल. देशात नवीन लॉकडाऊन अंतर्गत बुधवारपासून सर्व शाळा बंद ठेवल्या जातील. जॉनसन म्हणाले की, लॉकडाउन मागील लॉकडाउनसारखेच असेल, जे मार्चच्या उत्तरार्धात जूनपर्यंत लादले गेले होते.

पंतप्रधान म्हणाले की, देशासाठी ही कठीण वेळ आहे. देशाच्या प्रत्येक भागात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. सध्या यूकेमध्ये शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद राहतील. ऑनलाईन वर्ग सुरू होतील.

लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरामध्येच रहावे लागेल आणि त्यांना फक्त आवश्यक कामांसाठी सोडले जाईल. उदाहरणार्थ, लोक आवश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर जाऊ शकतात, जर त्यांना घरून काम करणे अशक्य असेल तर ते कार्यालयात जाऊ शकतात. सलून बंदच राहतील आणि रेस्टॉरंट्स केवळ टेकआउट सेवा प्रदान करतील.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार जगातील इतर अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. चीन आणि स्वीडनमध्ये रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातही एक रुग्ण सापडला आहे. 

दुसरीकडे, जगात कोरोना महामारीमुळे मृत्यूची संख्या 18 लाखांच्या पुढे गेली आहे.