वॉशिंग्टन : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोनामुळे १ लाखांपर्यंत लोकांना आपला जीव गमवावा लागेल, अशी भविष्यवाणी केली आहे. ही संख्या भीतीदायक असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं भाकीत ट्रम्प यांनी पहिल्यांदाच केलेलं नाही. याआधीही त्यांनी याबाबतचे त्यांचे अंदाज वर्तवले होते. यावेळी मात्र त्यांनी मृत्यूंची संख्या खूप जास्त सांगितली आहे. अनेक वेळा ट्रम्प यांनी ही आकडेवारी देताना अमेरिकेतल्या तज्ज्ञांनाही मागे टाकलं.
डोनाल्ड ट्रम्प मृत्यूच्या आकड्यांचं भाकीत वाढवून सांगत असल्याचा आरोपही अमेरिकेत होत आहे. चीनसोबत यात्रांवर निर्बंध लादून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रशासनाचा दावा योग्य असल्याचं ट्रम्प यांना सिद्ध करायचं आहे, असंही बोललं जातंय.
व्हाईट हाऊसमध्ये कोरोना व्हायरससाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे डॉक्टर डेबोरा बिर्क्स यांनीही भाकीत केलं होतं. कोरोनामुळे अमेरिकेत १ लाख ते २,४०,००० लोकांचा मृत्यू होईल, असं बिर्क्स २९ मार्चला म्हणाले होते. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नाही, तर एवढे मृत्यू होतील, असं बिर्क्स म्हणाले होते.
सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, हात स्वच्छ धुतले नाहीत, लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं नाही, तर अमेरिकेत १५ लाख ते २२ लाख लोकांना जीव गमवावा लागू शकतो, अशी भीतीही बिर्क्स यांनी सुरुवातीला वर्तवली होती. बिर्क्स यांच्या या दाव्यानंतर ट्रम्प यांनी सारवासारव करत जास्तीत जास्त १ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.