इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं पाकिस्तानमध्ये अस्तित्वच नसल्याचं पाकिस्तान सैन्यदलाकड़ून सांगण्यात आलं आहे. बुधवारी याविषयीची माहिती देण्यात आली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी काही दिवसांपूर्वीच इम्रान खान सरकार हे जैशच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्याचमागोमाग सैन्यदलाने पाकिस्तानात जैशचं अस्तित्वंच नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
'जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात अस्तित्वातच नाही. अमेरिका आणि पाकिस्तानकडून त्यावर बंदी घालण्यात आली आहे', असं पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी 'सीएनएन'ला दिलेल्या माहितीत सांगितलं. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे नेमकं खरं काय, हाच प्रश्न पुढे येत असून, पाकिस्तानकडून एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा एकदा दुसरं खोटं बोललं जात असल्याचं स्पष्ट होत आहे.
काही दिवसांपूर्वीच 'बीबीसी'शी संवाद साधत कुरेशी यांनी पाकिस्तान सरकारने जैशशी संपर्क साधत पुलवामा हल्ल्य़ामागे त्यांचा हात होता का, अशी विचारणा केली होती. पण, त्यांनी हल्ल्याची जबाबदारी फेटाळली होती. ही माहिती देण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी मसूद अझहर पाकिस्तानात असल्याची बाब उघड केली होती. त्यामुळे गोष्टींमध्ये असणाऱ्या अंतर्गत दुव्यांमध्ये बरीच गुंतागुत पाहायला मिळत आहे. गफूर यांनी जैशचं अस्तित्वही तेव्हा नाकारल आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये अझहरच्या भावासह एकूण ४४ दहशतवद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे कोणती नवी माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
१४ फेब्रुवारीला जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जैशने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं सांगण्यात आलं होतं. ४० जवानांना प्राण गमवावे लागलेल्या या आत्मघाती हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय वायुदलाने हवाई हल्ला करत, बालाकोट येथील जैशचे तळ उध्वस्त केले होते. पण, आता मात्र पाकिस्ताननेच जैशचं अस्तित्व नाकारलं आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सय्यद अकबरुद्दीन यांनीही नुकतंच २००१ मधील संयुक्त राष्ट्रांच्या सिक्युरिटी काऊन्सिलची एक यादी सर्वांसमोर आणली होती, ज्यामध्ये पाकिस्तानातच जैश-ए-मोहम्मदचं मूळ अस्तित्व असल्याचं नमूद करण्यात आलं होतं ज्याचं नाव अबोटाबादमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवादी ओलामा बिन लादेन याच्याशीही जोडलं गेलं होतं.