संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनचा पराभव

भारताच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं

शैलेश मुसळे | Updated: May 8, 2019, 12:45 PM IST
संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनचा पराभव title=

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रात भारताचा आणखी एक विजय झाला आहे. भारताच्या जगजीत पवाडिया या आतंरराष्ट्रीय नारकोटिक्स कंट्रोल बोर्ड (INCB) वर पुन्हा एकदा सदस्य म्हणून निवडल्या गेल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी चीनच्या हाओ वेई यांचा पराभव केला आहे.

संयुक्त राष्ट्रात आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या पहिल्या फेरीत जगजीत पवाडिया यांना ४४ मतं मिळाली. त्यांना जिंकण्यासाठी २८ मतांची गरज होती. मंगळवारी ५४ सदस्य असलेल्या इकोनॉमिक अँड सोशल काउंसिलच्या ५ सदस्यांची निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आलं. ५ पदासाठी १५ उमेदवार रिंगणात होते.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. जगजीत पवाडिया यांनी आयएनसीबीमध्ये पुन्हा निवड झाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. तसेच निपक्षपणे सेवा देण्याचं वचन दिलं आहे.

चीनने आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी प्रगतीशील देशांसोबत लॉबिंग करण्याचा देखील प्रयत्न केला. पण तरी त्यांचा मोठा फरकाने पराभव झाला. चीनच्या हाओ वेईला २२ मतं मिळाली. तर दुसऱ्या फेरीत फक्त १९ मतं मिळाली.

जगजीत पवाडिया यांना पहिल्या फेरीत ४४ मतं मिळाली. त्यानंतर फक्त मोरक्को आणि परागुआच्या उमेदवारांना २८ पेक्षा अधिक मतं मिळाली. मोरक्कोच्या जल्लाल तौफीक यांना ३२ तर परागुआच्या केसर टॉमस अर्स रिवास यांना ३१ मतं मिळाली. 

जगजीत पवाडिया यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असणार आहे. २ मार्च २०२० पासून त्यांचा कार्यकाळ सुरु होईल. याआधी २०१४ मध्ये पहिल्यांदा त्यांची येथे निवड झाली होती. २०१६ मध्ये त्या आयएनसीबीच्या उपाध्यक्ष आणि २०१५ आणि २०१७ मध्ये स्टँडिंग कमेटी ऑन इस्टीमेट्सच्या अध्यक्षा होत्या. पवाडिया भारतातील माजी नारकोटिक्स कमिश्नर आणि आयआरएस अधिकाही आहेत.

फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गेनायजेशनच्या डायरेक्ट जनरल पदासाठी देखील भारत आपली उमेदवारी देणार आहे. भारताने नीती आयोगचे सदस्य रमेश चंद्र यांना भारताचे उमेदवार बनवलं आहे. पुढच्या महिन्यात रोममध्ये होणाऱ्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गेनायजेशनच्या परिषदेत याची निवडणूक होणार आहे. रमेश चंद्र यांच्या विरोधात इतर देशांचे ४ उमेदवार रिंगणात आहे.