नालासोपाऱ्यातील 'गली बॉईज'चा अमेरिकेत झेंडा

कॅनडा, फिलिपाईन्स, दक्षिण कॅलिफोर्निया यांसारख्या देशातील डान्स ग्रुपला टाकलं मागे

Updated: May 7, 2019, 07:26 PM IST
नालासोपाऱ्यातील 'गली बॉईज'चा अमेरिकेत झेंडा  title=

प्रशांत अनासपुरे, झी 24 तास, मुंबई : नालासोपाऱ्यातल्या गली बॉईजनी अशक्य वाटणारं स्वप्न पाहिलं आणि त्यावर जीवतोड मेहनत घेत ते सत्यात उतरवलं. हे गली बॉय आता खऱ्या अर्थी द किंग्ज झाले आहेत. मुंबापुरीत सुपरस्टार होण्याची स्वप्न पाहणारे गली बॉय काही कमी नाहीत. नालासोपाऱ्यातील अशाच एका डान्स ग्रुपने थेट अमेरिकेत विजेतेपदाचा झेंडा फडकवला आहे. 

नालासोपाऱ्यातील द किंग्ज या डान्स ग्रुपने अमेरिकेतील वर्ल्ड ऑफ डान्स या रिएलिटी शोमध्ये विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. १४ जणांच्या या ग्रुपमध्ये कोरिओग्राफर सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्यातील १७ ते २१ वर्षे वयोगटातल्या या तरुणांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

विजेतेपदाच्या ट्रॉफीसह या ग्रुपला तब्बल सात कोटी रुपयांचं बक्षीसही मिळालंय. २६ फेब्रुवारीला ही स्पर्धा सुरू झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच अमेरिकेत पार पडली. अमेरिकेतील डान्स स्पर्धेत नालासोपाऱ्यातील द किंग्ज ग्रुपने विजेतेपद मिळवलं खऱं, मात्र अंतिम फेरीपर्यंतचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. जीवतोड मेहनत करत या भारतीय तरुणांनी बाजी मारली असली तरी अंतिम फेरीत कॅनडा, फिलिपाईन्स, दक्षिण कॅलिफोर्निया यांसारख्या देशातील डान्स ग्रुपशी तगडी स्पर्धा होती. मात्र भारताचं नाव जागतिक पातळीवर पोचविणाऱ्या या नालासोपारा द किंग्जनी आंतरराष्ट्रीय परीक्षकांकडून तब्बल शंभर पैकी शंभर गुण मिळवत धमाकेदार परफॉर्मन्स आणि जीवतोड मेहनतीबद्दल खास दाद मिळवली आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. 

स्वप्न पाहून ती सत्यात उतरविणाऱ्या नालासोपाऱ्यातल्या या द किंग्जमुळे भारतीयांची मान तर उंचावली आहेच. त्याचबरोबर अशी स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईचा उत्साहदेखील नक्कीच वाढण्यास मदत होईल.