Israel Hamas War : इस्रायल (Israel) हमास युद्धाने (Hamas War) सगळ्या जगाचं टेंशन वाढवलं आहे. या युद्धात (Israel-Palestine Conflict) दोन्ही बाजूकडील हजारो लोकांचा निष्पाप बळी गेलाय. दोन्ही बाजूकडील लोक सगळ्या ताकदीने एकमेकांविरोधात लढत आहेत. या युद्धात इस्रायलमधील राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच जण उतरले आहेत. मात्र आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Isreal PM Benjamin Netanyahu) यांच्या मुलामुळे या युद्धाला वेगळच वळण लागलं आहे. नेतान्याहू यांच्या एका फोटोमुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे. नेतन्याहूंच्या मुलावर इस्रायली सैनिकदेखील संतापले आहेत. 'आम्ही हमासशी लढतोय आणि तो मजा करतोय' अशी संतप्त प्रतिक्रिया सैनिक देत आहे.
बेंजामिन नेतान्याहू यांच्या मुलाचा अमेरिकेतील मियामी बीचवर सनग्लासेस घातलेला फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा यायर नेतन्याहू आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असताना जगभरातून इस्रायली नागरिक लढण्यासाठी परत येत आहेत. पण दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा यायर नेतन्याहू अमेरिकेच्या मियामी बीचवर मस्ती करत आहे. दुसरीकडे अनेक सैनिक पंतप्रधान नेतन्याहू यांना याबाबत प्रश्न विचारत आहेत. तुमचा मुलगा कुठे आहे? असे सवाल उपस्थित केला जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, नेतन्याहू यांचा 32 वर्षीय मुलगा यायर नेतन्याहू एप्रिलपासून फ्लोरिडामध्ये आहे.
यायरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय. सीमेवर तैनात असलेल्या जवानाने सांगितले की, "मी सीमेवर तैनात आहे आणि यायर मियामी बीचवर जगण्याचा आनंद घेत आहे. आम्ही आमची नोकरी, कुटुंबे, मुले सोडली आणि आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी परत आलो. आमचे भाऊ, वडील, मुलगा, प्रत्येकजण सीमेवर आहे. पण यायर अजून इथे आलेला नाही. अशामुळे देशाच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण होत नाही."
बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा यायर नेतन्याहू याने हायस्कूलमध्ये थिएटरचे शिक्षण घेतलं आहे. यायरने इस्रायलमधील प्रत्येकासाठी अनिवार्य असलेले लष्करी प्रशिक्षण देखील घेतले होते. पण त्याने लढाऊ सैनिक म्हणून नव्हे तर इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्या युनिटमध्ये काम केले होते. मात्र दुसरीकडे देशासाठी लढून परत आलेल्या अनेक सैनिकांमध्ये त्याच्या मियामीमधल्या फोटोवरुन प्रचंड राग निर्माण झालाय.