Israel-Hezbollah War: 'तातडीनं देश सोडा..' तणाव वाढताच भारतीयांना दिल्या जात आहेत या सूचना

Israel-Hezbollah War: नेमकं काय घडलं आहे? केंद्रीय यंत्रणाही सतर्क. कोणासाठी जारी करण्यात आल्या आहेत या सूचना? पाहा सविस्तर वृत्त...   

सायली पाटील | Updated: Sep 26, 2024, 08:57 AM IST
Israel-Hezbollah War: 'तातडीनं देश सोडा..' तणाव वाढताच भारतीयांना दिल्या जात आहेत या सूचना  title=
Israel Hezbollah War Leave Lebanon immediately India UK issued advisory for their citizens latest update

Israel-Hezbollah War: आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या अनेक घडामोडींचे परिणाम कमीजास्त स्वरुपात भारतावरही होताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार लेबनानमध्ये इस्रायलनं हवाई हल्ले वाढवले असून, या हल्ल्याचं उत्तर देत आता हिज्बुल्लाहनंही इस्रायलवर हल्ला चढवला आहे. ज्यामुळं आता परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली असून, याच धर्तीवर भारतीय दूतावासाच्या वतीनं तिथं वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना तातडीनं देश सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. इतकंच नव्हे, तर पुढील सुचनेनुसार लेबनानचा प्रवास टाळण्याचा सल्लाही जारी केला आहे. 

तणावाची परिस्थिती पाहता लेबनानच्या वतीनं भारतीयांना अधिक सावधगिरी बाळगत दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देत अशा मंडळींसाठी काही Helpline Number सुद्धा जारी करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासानं जारी केलेल्या पत्रकानुसार, 'लेबनानमध्ये हजर असणाऱ्या भारतीयांना तातडीनं देश सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जी माणसं काही कारणानं इथं थांबतील त्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असून, आपल्या दैनंदिन उपक्रमांना सिमीत ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. याशिवाय या मंडळींनी cons.beirut@mea.gov.in या ईमेल आयडीवर किंवा +96176860128 या आपात्कालीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.'

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मुंबईत पावसाची विश्रांती; ठाणे, कोकणात काय परिस्थिती?  

इतर देशांनीही दिला सावधगिरीचा इशारा...

फक्त भारतच नव्हे तर, इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये सुरू असणाऱ्या या संघर्षानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीसुद्धा ब्रिटीश नागरिकांना तातडीनं लेबनानं सोडण्याचे निर्देश आहेत. याशिवाय आपात्कालीन निकासाची गरज भासल्यामुळं जवळपास 700 ब्रिटीश सैनिकांना सायप्रस इथं तैनात करण्यात आलं आहे. 

इस्रायलनं लेबनानमध्ये पेजरच्या माध्यमातून घडवून आलेल्या स्फोटांनंतर परिस्थितीला आणखी एक तणावपूर्ण वळण मिळालं. ज्यामुळं आता संपूर्ण जगभरातही कमीजास्त प्रमाणात या संघर्षाचे परिणाम दिसून येत आहेत.