इस्रायलचा चुकून इजिप्तवर हल्ला, नेतन्याहू यांचा लेबनानला इशारा अन्...; Israel युद्धाचे 10 Updates

Israel Hamas War Warning To Hezbollah Top 10 Updates: हमास आणि इस्रायलदरम्यान सुरु असलेल्या या युद्धाला 16 दिवसांचा कालावधी उलटून गेला असून हा संघर्ष अधिक वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 23, 2023, 10:15 AM IST
इस्रायलचा चुकून इजिप्तवर हल्ला, नेतन्याहू यांचा लेबनानला इशारा अन्...; Israel युद्धाचे 10 Updates title=
इस्रायलच्या पंतप्रधानांनीच दिला इशारा

Israel Hamas War Warning To Hezbollah Top 10 Updates: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असेल्या युद्धाला 16 दिवस उलटून गेले आहेत. दोन्ही बाजूचे जवळपास 6 हजार लोकांचा या संघर्षामध्ये मागील 16 दिवसांमध्ये मृत्यू झाला आहे. 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमधून लाखो लोकांनी स्थलांतर केलं आहे. या सर्व गोंधळादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला पाठिंबा देणाऱ्या लेबनानमधील कट्टरतावादी संघटना हिजबुल्लाहला इशारा दिला आहे. हमासला हिजबुल्लाह साथ देत असल्याचं नमूद करत इस्रायल इशारा दिला आहे. इस्रायलमधील सुरक्षा यंत्रणा आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या युद्धात हिजबुल्लाहने उडी घेतली असून ते हमासला मदत करत असल्याने संघर्ष अधिक तिव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भातील 10 महत्त्वाच्या अपडेट्स पाहूयात...

1) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहला कठोर शब्दांमध्ये इशारा दिला आहे. इस्रायलचे लष्कर आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात हिजबुल्लाहने उडी घेणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरु शकते, असं सूचक विधान नेतन्याहू यांनी केलं आहे. लेबनान बॉर्डरवर पोहोचलेल्या नेतन्याहू यांनी इस्रायलच्या लष्करी जवानांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी, "(हिजबुल्लाह) आणि लेबनानने या युद्धात उडी घेतल्याच त्यांचा विनाश होईल. मात्र आम्ही सर्व प्रकारची परिस्थिती हातळण्यासाठी तयार आहोत," असं म्हटलं.

2) दुसरीकडे इस्रायल डिफेन्स फोर्सने रविवारी चुकून गोळीबार केला आणि केरेम शालोम प्रांतामध्ये गाझाच्या सीमेला लागू असलेल्या इजिप्तमधील एका जहाजं उभी राहतात त्या बंदराला लक्ष्य केलं. 'टाइम्स ऑफ इस्रायल'मधील वृत्तानुसार, इजिप्तच्या लष्करी प्रवक्त्यांनी इस्रायलकडून हल्ला होऊ शकतो याची कल्पनाही नसल्याने या गोळीबारामध्ये आमचे काही सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत.

3) इस्रायल डिफेन्स फोर्सच्या विमानांनी रविवारी सेंट्रल कॅम्प ब्रिगेडमध्ये आग तसेच तोफांनी केलेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत हमासच्या स्थानिक तोफखान्याचा उप-प्रमुख मोहम्मद कटमशला ठार केलं.

4) पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार इस्रायल आणि हमासदरम्यान सुरु असलेल्या युद्धात मरण पावलेल्या लहान मुलांची संख्या 1873 इतकी झाली आहे.

5) इस्रायल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या 769 नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 16 दिवसांमध्ये इस्रायल आणि हमासच्या युद्धादरम्यान आतापर्यंत संयुक्त राष्ट्राच्या 29 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

6) हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या युद्धामध्ये गाझा पट्टीतील जवळ पास 4,651 जणांचा मृत्यू झाला आङे.

7) भारताने सुरु केलेल्या 'ऑप्रेशन अजय' अंतर्गत रविवारी 2 नेपाळी नागरिकांसहीत 4 लहानमुलांबरोबरच 143 लोकांना घेऊन भारताच्या दिशेने विशेष विमानाने झेप घेतली.

8) इस्रायलविरुद्ध सुरु असलेल्या युद्धामध्ये गाझामधील पॅलेस्टाइन समर्थकांसाठी भारताने पाठवलेली वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन वस्तूंचा पुरवठा रविवारी इजिप्तमध्ये पोहोचला.

9) अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी रविवारी, मिडल इस्टमध्ये कोणताही तणाव निर्माण झाल्यास त्याविरोधात अमेरिका कठोर कारवाई करेल, असा इशारा दिला.

10) पॅलेस्टाइनमध्ये चहू बाजूंनी अडकून पडलेल्या पॅलेस्टाइन समर्थकांच्या मदतीचं साहित्य घेऊन आलेले 17 ट्रक रविवारी गाझामध्ये दाखल झाले. फ्रान्सने इस्रायलला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर पॅलेस्टाइनला समर्थन करणारे हजारो लोक फ्रान्समध्ये रस्त्यावर उतरले.