...अन् देशभरात सायरन वाजू लागले; इस्रायलकडून युद्धाची घोषणा, पॅलेस्टाईनकडून रॉकेट्सचा वर्षाव

रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेलं युद्ध अद्यापही संपलेलं नसताना आता आणखी एका युद्धाची घोषणा झाली आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध जाहीर केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2023, 11:54 AM IST
...अन् देशभरात सायरन वाजू लागले; इस्रायलकडून युद्धाची घोषणा, पॅलेस्टाईनकडून रॉकेट्सचा वर्षाव title=

पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांनी लष्करी कारवाई असा उल्लेख करत इस्त्रायलवर रॉकेटने हल्ला केला आहे. गाझा पट्टीवरुन हे रॉकेट्स इस्त्रायलवर डागण्यात आले. यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. रॉकेट्स हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्त्रायलने नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची सूचना केली आहे. 

पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करत डझनभर रॉकेट़ डागले असता एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे. गाझा पट्टीतून झालेल्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलला युद्धाची स्थिती घोषित करावी लागली आहे. इस्रायल लष्कारने दिलेल्या माहितीनुसार, “बरेच दहशतवादी इस्रायलच्या हद्दीत घुसले आहेत”. सोशल मीडियावर काहींनी व्हिडीओ शेअर केले असून सीमावर्ती शहर Sderot येथे गणवेश घातलेला बंदूकधारी दिसत आहेत. व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. पण या व्हिडीओंची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. 

सकाळी उत्तरेकडे सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेल अवीवपर्यंत, गाझामध्ये हवेतून उड्डाण करणाऱ्या रॉकेटचे आणि सायरन ऐकू येत होते. इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अडोम बचाव संस्थेने सांगितले की, दक्षिण इस्रायलमधील एका इमारतीवर रॉकेट आदळल्याने 70 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तसंच 20 वर्षांचा तरुणही जखमी झाला आहे. 

संपूर्ण दक्षिण आणि मध्य इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले सुरू असल्याने लाखो नागरिकांना त्यांच्या घरांमध्येच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. गाझाच्या शेजारी असलेल्या रहिवाशांनी त्यांच्या घरातच राहावे असं लष्कराने सांगितलं आहे.

इस्त्रायलविरोधात लष्करी कारवाई असल्याचा हमासचा दावा

हमासच्या लष्करी शाखेचा नेता मोहम्मद देईफ याने सशस्त्र गटाने इस्रायलविरुद्ध नवीन लष्करी कारवाई सुरू केली असल्याचं म्हटलं आहे. मोहम्मद डेफने सांगितलं आहे की, “ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म” सुरू करण्यासाठी शनिवारी पहाटे 5000 रॉकेट इस्रायलवर डागण्यात आले. आता पुरे झालं असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. यावेळी त्याने पॅलेस्टाइन नागरिकांना इस्रायलचा सामना करण्याचं आवाहन केलं आहे. 

इस्त्रायलने अनेकदा मोहम्मद देईफच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. पण तो त्यातून वाचला आहे. तो कधीच सार्वजनिकपणे समोर येत नाही. त्याचा संदेश रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देण्यात येतो. 

गाझामध्ये इस्रायलची नाकेबंदी

इस्रायलचा विरोध करणार्‍या हमास या इस्लामिक अतिरेकी गटाने 2007 मध्ये भूभाग ताब्यात घेतल्यापासून इस्रायलने गाझावर नाकेबंदी केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यात चार युद्धं झाली आहेत. इस्त्रायल, हमास आणि गाझामधील इतर लहान अतिरेकी गट यांच्यात आतापर्यंत असंख्य वेळा संघर्ष झाला आहे. 

गाझामध्ये नाकाबंदी असून बाहेरील लोक आणि वस्तूंच्या हालचालींवर निर्बंध असल्याने प्रदेशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. दहशतवादी गटांना त्यांचे शस्त्रागार तयार करण्यापासून रोखण्यासाठी नाकेबंदी आवश्यक असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. तर ही सामूहिक शिक्षा आहे  असं पॅलेस्टिनींचे म्हणणं आहे.