भारताच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीनं चीन चवताळला, भारताची बदनामी करण्याचं षडयंत्र

भारताची बदनामी करण्याचं षडयंत्र चीननं रचलं आहे.

Updated: Jan 28, 2021, 10:02 PM IST
भारताच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीनं चीन चवताळला, भारताची बदनामी करण्याचं षडयंत्र title=

नवी दिल्ली : सगळ्या जगाला हैराण करणाऱ्या कोरोनावर भारतानं लस शोधली. या घडीला भारतात निर्माण झालेली लस शेजारच्या मित्रराष्ट्रांसाठीही वरदान ठरते आहे. भारतानं शेजारच्या अनेक देशांनाही लसीचा पुरवठा केलाय. पण त्यामुळे चीनचा चांगलाच जळफळाट होतोय. त्यामुळे भारताची बदनामी करण्याचं षडयंत्र चीननं रचलं आहे.

चीनच्या व्हॅक्सिनच्या चाचण्या बांग्लांदेशनं थांबवल्या

चीनचं सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाईम्सची मुख्य बातमी आहे चीनच्या लसीच्या चाचण्या बांग्लादेशमध्ये स्थगित करण्यात आल्याची. पण त्याचं खापर मात्र चीननं भारतावर फोडलं आहे. भारतानं पडद्यामागून हस्तक्षेप करत चीनच्या सायनोव्हॅक लसीच्या चाचण्या बांग्लादेशात थांबवल्याचं चीनी सरकारी वृत्तपत्रानं म्हटलं आहे. विशेष म्हणजे गुरुवारपासून बांग्लादेशात भारतानं दिलेल्या कोव्हिशिल्डचं लसीकरण सुरु होतंय..त्यामुळे चीनचा आणखी जळफळट होतो आहे.

अपयश झाकण्यासाठी भारतावर खापर फोडण्याचा चीनचा प्रयत्न

जानेवारीच्या सुरुवातीला भारतानं दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली. तेव्हापासून आतापर्यंत आपल्या शेजारच्या ८ लहान राष्ट्रांना कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकच्या लसी निर्यात करण्यात आल्या. महत्वाचं म्हणजे भूतान, श्रीलंका, बांग्लादेश सारख्या देशांना भारतानं मैत्री खातर सुरुवातीचे डोस भेट म्हणून दिलेत. भारताच्या या व्हॅक्सिन डिप्लोमसीमुळे दक्षिण आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या मसुब्यांना हादरा बसलाय.

डोकलाम, लडाखमध्ये चीनचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला. चीनमधून अख्ख्या जगात पसरलेल्या कोरोनावर  हायड्रोक्लोरोक्विनसारख्या औषधांसाठीही जगानं भारताकडे मदत मागितली...आता २०२१च्या सुरुवातीलाच लस आणून भारतानं आणखी एक लढाई जिंकली.. तिकडे चीनच्या सायनोव्हॅक नावाच्या व्हॅक्सिनकडे मात्र संपूर्ण जगानं पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळे ड्रॅगनच्या तळपायाची आग मस्तकाला गेली नसती तरच नवल...अर्थात सध्या भारताच्या बदनामीसाठी चीननं त्याचं प्रपोगांडा मशीन वापरायला सुरुवात केली असली..तरी तो एवढ्यावर थांबणार नाही.. हे नक्की...