पाकिस्तानच्या खोटारडेपणाला भारताचे पुन्हा सणसणीत उत्तर

न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा सणसणीत उत्तर दिलंय. पाकिस्तानी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पॅलेस्टाईनच्या जखमी महिलेचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या अत्याचाराचं खोटं चित्र उभं करण्याचा बाष्कळ प्रयत्न केला.  

PTI | Updated: Sep 26, 2017, 07:59 AM IST
पाकिस्तानच्या खोटारडेपणाला भारताचे पुन्हा सणसणीत उत्तर title=

नवी दिल्ली : न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा सणसणीत उत्तर दिलंय. पाकिस्तानी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पॅलेस्टाईनच्या जखमी महिलेचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या अत्याचाराचं खोटं चित्र उभं करण्याचा बाष्कळ प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना भारतानं ते छायचित्र इस्त्राईलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचं असल्याचं पुराव्यासह स्पष्ट केलं.

हे छायाचित्र सतरा वर्षीय रोवाया अबू जोमाचं असून ते जुलै २०१४मध्ये अमेरिकन छायाचित्रकार हैदी लेव्हिन यांनी काढल्याचं भारतानं स्पष्ट केलं.  शिवाय  पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी केलेल्या अपहरण आणि हत्येची  सत्य कथा संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मांडली. मे  महिन्यात पाकिस्तान सर्मथित दहशतवाद्यांनी  २२ वर्षीय  लेफ्टनंट उमर फैय्याज यांचं एका लग्नसोहळ्यातून अपहरण केले. त्यानंतर त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली.

त्याच लेफ्टनंट फैय्याज यांच्या मृत्यूचा घटनाक्रम भारताच्या संयुक्त राष्ट्रातल्या प्रतिनिधी पोलिमी त्रिपाठी यांनी सर्वसाधारण सभेत मांडला. त्यानंतर सीमेपलिकडून भारतात निर्यात होणाऱ्या दहशतवादाचं हेच खरं चित्र असल्याचं त्रिपाठी यांनी सर्वसाधारण सभेत ठासून सांगितलं. यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा तर जाहीर झालाय.