इस्लामाबाद : पाकिस्तानात निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष आलेल्या पीटीआयचे प्रमुख इम्रान खान येत्या १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिनेटर फैजल जावेद यांनी ट्विट करुन याची माहिती दिलेय. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव, पंजाबचे उपमुख्यमंत्री नवज्योतसिंग सिद्धु आणि सुनील गावस्कर यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण सांगण्यात आलेय.
इम्रान खान १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी १३ ऑगस्ट रोजी संसदेचे सत्र बोलावले आहे. या सत्रात नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील. पीटीआयच्या संसदीय समितीने सोमवारी इम्रान खान यांना संसदीय दलाचे नेते म्हणून निवडले आणि पंतप्रधानपदासाठी नामांकित केले, अशी माहिती ट्विट करुन फैजल जावेद यांनी दिलेय.
PM-designate #ImranKhan to take oath as the Prime Minister of Pakistan on August 18: Pakistan Tehreek-e-Insaf pic.twitter.com/jXPvMgeV9z
— ANI (@ANI) August 10, 2018
२५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत पीटीआयने सर्वाधिक ११६ जागा मिळवल्या आहेत. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती हुसेन यांनी पंतप्रधानपदाच्या शपथविधीमुळे आपली स्कॉललँडचा दौरा रद्द केलाय. ममनून १६ ते १९ ऑगस्टदरम्यान एडिनबर्गचा दौरा करणार होते. आता ते शपथविधी सोहळ्यानंतर हा दौरा करतील. दुसरीकडे निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी इम्रान खानला विनाशर्त माफी दिली आहे. त्यामुळे इम्रान खान यांचा शपथविधीतील मोठा अडसर दूर झाला आहे. इमरान यांनी ५ ठिकाणांहून निवडणूक लढवली होती. पाचही ठिकाणी ते विजयी झाले आहेत.