वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. कॅपिटॉल हिलमधील हिंसाचारास उत्तेजन दिल्याच्या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यासंदर्भात कायदा संमत करण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यात येत असल्याचं अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाल्यास कार्यभार सोडण्याआधीच त्यांना पदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे.
राज्यघटना आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तातडीने पावलं उचलण्यास तयार आहोत. ट्रम्प यांच्या वर्तनानं लोकशाही आणि राज्यघटना या दोन्हींना धोका निर्माण झाला आहे. प्रतिनिधीगृहाचे अधिवेशन चालू नसल्यानं या प्रस्तावास सध्या आक्षेप येऊ शकतो. त्यामुळे पलोसी या आज हा प्रस्ताव पूर्ण सभागृहाच्या अधिवेशनात मांडू शकतात. तो संमत करण्यासाठी पेन्स आणि मंत्रिमंडळ यांना 24 तासांचा अवधी द्यावा लागेल. त्या मंजुरीनंतर ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल होऊ शकतो. ट्रम्प यांच्यावर 20 जानेवारीपूर्वीच पद सोडण्यासाठी दबाव वाढला आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोगाचे मैदान तयार केले गेले आहे. ट्रम्प यांच्यावरील आरोपांचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर 190 डेमोक्रेट सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे, परंतु ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही खासदाराने अद्याप त्याचे समर्थन केले नाही. संसदेच्या खालच्या सभागृहात सोमवारी महाभियोगाचा प्रस्ताव आणला जाऊ शकतो. या सभागृहात डेमोक्रेटकडे बहुमत आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य टेड लिऊ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सभागृहातील पक्षाचे सदस्य सोमवारी महाभियोगासाठी प्रस्ताव आणतील. यासंदर्भात तयार केलेल्या मसुद्यावर शनिवारी रात्रीपर्यंत 190 डेमोक्रेटच्या खासदारांनी स्वाक्षरी केली. कोणत्याही रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी अद्याप त्यावर स्वाक्षरी केलेली नाही.