नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक आणि भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजुनं निकाल दिलाय. 'आयसीजे'नं पाकिस्तानला जाधव प्रकरणात दिलेल्या फाशीच्या निर्णयाचा आणि न्यायदान प्रक्रियेवर पुनर्विचार करण्यास सांगितलंय. पाकिस्ताननं व्हिएन्ना करार तसंच मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचंही 'आयसीजे'नं नमूद केलंय. 'प्रेसीडेन्ट ऑफ द कोर्ट' न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी आंतराराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल वाचला. ही सुनावणी बुधवारी ६.३० वाजता नेदरलँडच्या 'द हेग' स्थित पीस पॅलेसमध्ये पार पडली. आयसीजेच्या १५ सदस्यीय पीठानं भारत आणि पाकिस्तानचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हा बहुप्रतिक्षित निकाल दिलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यानंतर तब्बल दोन वर्ष आणि दोन महिन्यांनी हा निकाल आलाय.
२५ मार्च २०१६ पासून कुलभूषण जाधव सलग कॉन्स्युलर एक्सेसची मागणी करत आहेत. २०१६ मध्येच पाकिस्तानातील भारतीय उच्चयोगाकडून जाधव यांच्या अटकेची माहिती मिळाली होती. पंरतु, आजपर्यंत पाकिस्ताननं जाधव यांना राजनैतिक मदत (कॉन्स्युलर एक्सेस) दिलेला नाही. त्यामुळे, भारतानं ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर हे प्रकरण नेलं होतं. राजनैतिक मदत नाकारून पाकिस्ताननं कराराचं उल्लंघन केल्याचं भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात सिद्ध केलंय. व्हिएन्ना कराराद्वारे दोन्ही देशातील कैद्यांना राजनैतिक मदत देणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं १८ मे २०१७ रोजी जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. आता कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान न्यायालयानं आपल्या निर्णयाचं आणि निर्णय प्रक्रियेचं पुनरावलोकन आणि पुनर्विचार करावा, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेत.
आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) च्या कायदे सल्लागार रीमा ओमार यांनी ट्विटरवरून दिली माहिती
And the decision in the #Jadhav Cade is out!
ICJ has ruled in favour of India on merits, affirming Jadhav’s right to consular access and notification
The Court has directed Pakistan to provide effective review and reconsideration of his conviction and sentences pic.twitter.com/DE3dAb9eIv
— Reema Omer (@reema_omer) July 17, 2019
कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय दिल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. 'पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराच्या कलम ३६ चा भंग केला हे ICJ नं मान्य केलं. पाकिस्ताननं या निकालाच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर भारताला सुरक्षा समितीकडे दाद मागता येईल' असंही त्यांनी म्हटलंय.
मुंबईच्या पवई परिसराचे रहिवासी असलेले ४९ वर्षीय कुलभूषण जाधव व्यापारानिमित्त ईराणला गेले असताना पाकची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'ने त्यांचं तिथूनच अपहरण करत त्यांना अटक केली होती. कुलभूषण यांना भारताचा 'गुप्तहेर' ठरवत हेरगिरी आणि घातपाती कृत्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसंच या आरोपांखाली दोषी ठरवत एप्रिल २०१७ ला पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्यूदंड ठोठावला होता.
- कुलभूषण जाधव, त्यांचे कुटुंबीय यांच्यासहीत संपूर्ण भारताला मोठा दिलासा
- आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा विजय
- कुलभूषण यांना राजनैतिक मदत मिळणार
- भारत - पाकिस्तानला व्हिएन्ना करार बंधनकारक
- १५ विरुद्ध १ मतानं भारताच्या बाजुनं निर्णय... केवळ पाकिस्तानच्या न्यायाधीशांचा विरोध
- पाकिस्ताननं शिक्षेचा फेरविचार करावा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा (ICJ) निर्णय
- कुलभूषण जाधव यांच्या प्राथमिक मानवाधिकारचं पाकिस्तानकडून उल्लंघन
- कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती कायम
- व्हिएन्ना कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन