मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक

त्याच्यावर अनेक दहशतवादी कारवायांचे आरोप 

Updated: Jul 17, 2019, 01:27 PM IST
मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : असंख्य दहशतवादी कारवाया आणि मुख्य म्हणजे मुंबई हल्ल्यांमागे असणारा सूत्रधार हाफिज सईद, याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. पाकिस्तानमधील लाहोर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या दबाव तंत्राला मोठं यश आल्याचं म्हटलं जात आहे. २६/११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे सईद मुख्य सूत्रधार होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी भारताकडून आधीपासून दबाव टाकण्यात आला होता. 

सईदला पाकिस्तानमध्ये पंजाबच्या काऊंटर टेररिजम डिपार्टमेंट (CTD) यांच्यातर्फे ताब्यात घेण्यात आलं आहे. टेरर फंडिंगच्या आरोपाअंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या साऱ्या घडामोडींवर भारताचंही लक्ष असेल. 

लाहोर उच्च न्यायालयातून सईदने दिलं होतं त्या निर्णयाला आव्हान.... 

काही दिवसांपूर्वी हाफिज सईद आणि इतर काही दहशतवाद्यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्याला लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार सईदसह ज्यांनी आर्थिक मदत पुरवण्यासंबंधीच्या खटल्याला आव्हान केलं होतं, त्यामध्ये अब्दुर रहमान मक्की, आमिर हमजा, एम. यहया अजीज आणि चार इतर दहशतवाद्यांचाही समावेश आहे. 

दहशतवादी कारवायांसाठी पाच संस्थांच्या माध्यामातून, आर्थिक पाठबळ देत असल्यासंबंधीचे २३ खटले सईद आणि त्याच्या इतर १२ सहकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले होते.  

आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून त्याला घोषित करण्यात आलेल्या सईदला पाकिस्तान भारताच्या ताब्यात देणार का हा एक महत्त्लाचा प्रश्नच आहे. तूर्तास त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिक दौऱ्यापूर्वीच ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावरही ही एक मोठी घडामोड असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेवर प्रभाव पाडण्यासाठीच ही पाकिस्तानची खेळी आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आपल्या राष्ट्राकडून दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत, असं भासवण्यासाठी पाकिस्तानडून हे पाऊल उचलण्यात आलं असावं, असंही म्हटलं जात आहे.