मुंबई : मुंबईवरच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी सिद्ध झालेला पाकिस्तानी - अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याच्यावर तुरुंगात हल्ला झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. परंतु, ही बातमी धादांत खोटी आहे... हेडली तुरुंगातही नाही आणि रुग्णालयातही नाही, असा दावा हेडलीच्या वकिलानं केलाय.
हेडलीवर कथित रुपात तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हेडलीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं होतं. यावर बोलताना डेव्हिड हेडलीचा वकील जॉन थेइस यानं पीटीआयशी बोलताना या बातम्या खोट्या असल्याचा दावा केला... हेडली शिकागोमध्ये नाही किंवा तो हॉस्पीटलमध्येही नाही... हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याच्या किंवा तो गंभीर झाल्याच्या बातम्याही खोट्या आहेत, असं थेइस यानं म्हटलंय. आपण हेडलीच्या नियमित संपर्कात आहोत, मात्र सध्या तो कुठे आहे हे सांगू शकणार नाही, असंही जॉन थेइस यानं म्हटलं.
डेव्हिड कोलमॅन हेडलीचं खरं नाव दाऊद सैय्यद गिलानी असं आहे. तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबासाठी काम करत होता. २००२ ते २००५ दरम्यान हेडलीनं पाकिस्तानात लष्कराच्या पाच प्रशिक्षण शिबिरांत सहभाग घेतला होता. यात त्याला हल्ल्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा कट रचण्याच्या आरोपाखाली अमेरिकेच्या शिकागो कोर्टानं हेडलीला २०१३ साली ३५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. या दहशतवादी हल्ल्यात १६० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.