पेईचिंग : तुम्ही जास्तीत जास्त किती मोठा मच्छर पाहिला आहे? काही अंदाज? खरे तर, हा प्रश्नच मुळात अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. पण, हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे चीनमध्ये सापडलेला मच्छर. चीनमध्ये एक असा मच्छर सापडला आहे. ज्याची नोंद जगातील सर्वात महाकाय मच्छर म्हणून करण्यात आली आहे. हा मच्छर चक्क ११.१५ सेंटीमीटर इतक्या अंतरावर आपले पंख पसरवतो.
चीनची सरकारी संस्था मीजिया शिन्हुआने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, हा मच्छर गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सापडला आहे. पश्चिम चीनच्या कीटक संग्रहालयाचे क्यूरेटर चाओ ली यांनी सांगितले की, हा मच्छर जगातील सर्वात लांबीचे असलेल्या मच्छरांच्या प्रजातीपैकी एक आहे. सर्वात प्रथम मच्छरांची ही प्रजाती जपानमध्ये सापडली होती. संशधकांनी केलेल्या आजवरच्या अभ्यासात मच्छरांच्या पंखांची लांबी ही जास्तीत जास्त ८ सेंटीमीटर इतकी असल्याची नोंद आहे. मात्र, हा मच्छर सापडल्यामुळे या महाकाय मच्छराची नव्याने नोंद झाली आहे.
क्यूरेटर चाओ ली यांनी म्हटले की, या मच्छरांचे वैशिष्ट्य म्हणजे, हा मच्छर महाकाय असला तरी, माणसाचे रक्त पित नाही. या मच्छरांतील नराचे आयुष्य काही दिवसांचेच असते. फुलांचे परागकण हा या मच्छरांचा आहार असतो. लीच्या दाव्यानुसार, जगभरात मच्छरांच्या हजारो प्रजाती आहेत. यातील साधारण १००च्या आसपास प्रजातीच अशा आहेत ज्या माणसांसाठी समस्या ठरतात.