वॉशिंग्टन : अमेरिकेत ( USA) फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला (Pfizer Covid Vaccine) परवानगी देण्यात आली आहे. आपत्कालीन वापरासाठी फायझरच्या (Pfizer) 'लस'ला ( Covid Vaccine) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या औषध विभागाने (एफडीए) फाइजरला तातडीने फायझर (Pfizer COVID-19 Vaccine) लस वापरण्यास मान्यता दिली आहे. आजपासून अमेरिकन नागरिकांना लस दिली जाऊ शकते. आता अमेरिका देखील केरोना लस वापरास मान्यता देणाऱ्या ब्रिटन आणि बहारीनसारख्या देशांच्या श्रेणीत दाखल झाली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ९२ हजार नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना लसीकरण धोरणाला प्राधान्य दिले होते. त्यानुसार आता कोरोना लस उपलब्ध झाली आहे. सुरूवातीला सुमारे २० लाख आरोग्य सेवक आणि वयोवृद्ध नागरिकांना 'लस'साठी प्राधान्य दिले जाणार आहे. एफडीएने फायझरच्या कोरोना 'लस'च्या तातडीच्या वापरास मंजुरी मिळताच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, २४ दिवसांत ही लस संपूर्ण देशात दिली जाईल. ट्रम्प म्हणाले की हा आजार चीनकडून आला आहे, परंतु आता अमेरिकेत हा रोग निर्मूलन होईल. ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले, 'आज देशातील वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार घडला आहे. आम्ही ९ महिन्यांत एक सुरक्षित आणि प्रभावी लस तयार केली आहे.
या लसीमुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचतील. ही लस सर्व अमेरिकन लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मला अभिमान वाटतो. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात लस पाठविली जात आहे. ही लस कोरोनाला हद्दपार करेल, असे ते म्हणाले.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत तीन लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत दोन लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण अमेरिकेत सापडलेत. २४ तासांत दोन हजार ८९५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
अमरिकेत तीन नोव्हेंबरनंतर दररोज लाखभर नव्या रुग्णांची नोंद होतेय. अमेरिकेत आत्तापर्यंत १ कोटी ६० लाख रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी अमेरिकी प्रशासनाने मोठा निर्णय घेत फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला परवानगी दिली आहे.