आधीच मंदीचे सावट त्यात चीनमध्ये करोनाचं थैमान!; जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

Covid-19 : चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या 'बीएफ.7' या व्हेरिएंटचे भारतात तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. गुजरातमध्ये 2 तर ओडिसामध्ये 1 असे तीन रुग्ण आढळून आले आहेत.

Updated: Dec 22, 2022, 02:08 PM IST
आधीच मंदीचे सावट त्यात चीनमध्ये करोनाचं थैमान!; जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? title=

Covid-19 in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसतेय. त्यामुळे चीनसह जगाचे टेंन्शन वाढलं आहे. यामुळे भारताचीही (Corona( चिंता वाढली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या 'बीएफ.7' या व्हेरिएंटचे भारतात तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. चीनमध्ये आढळेल्या व्हेरिएंटचे गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एक असे तीन रुग्ण आढळून आले आहेत.

भारतीय यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे मास्कचा वापर, लसीकरण वर इतर उपाय करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला आहे. जास्तीत जास्त कोरोना रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेंनसिंगसाठी पाठवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्या आहेत.

जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता

जगभरात मंदीचे सावट असताना चीनमध्ये वाढते कोरोना रुग्ण खरोखरच चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने केवळ चीनच्या अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राजधानीचे शहर असलेल्या बीजिंगमध्ये ऑफिस, शॉपिंग सेंटर, रस्ते निर्जन पडले आहेत. लोकांनी घाबरुनच औषधे आणि कोविड टेस्ट किट घेण्यास सुरुवात केली आहे.

रुग्णांची आकडेवारी देण्यास चीनचा नकार

कोविड विषाणूचा नवा व्हेरिएंट हा संपूर्ण देशभरात पसरत असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. नोव्हेंबर मध्यावर चीनमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 2,000 होती. डिसेंबर सुरुवातीपर्यंत ती 5,000 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे चीनच्या आरोग्य विभागाने 14 डिसेंबर पासून रोजची आकडेवारी देण्याचेही बंद केले आहे.

जगावर काय परिणाम होणार?

दोन वर्षांच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. देशांतर्गत सेवा क्षेत्रावर कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे 2022च्या सुरुवातीला 16 ते 24 वयोगटातील पाचपैकी एक चिनी नागरिक बेरोजगार होता. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार पुढील वर्षी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचवेळी दुसरीकडे 11.6 दशलक्ष लोक नोकरीच्या शोधात बाहेर पडणार आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारपेठेत चीनचा मोठा वाटा

कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जगातील दुसऱ्या क्रमांकाची असलेली चीनची अर्थव्यवस्था आणखी एका संकटात सापडू शकते. जागतिक पुरवठा साखळीत आणखी व्यत्यय येण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये, जागतिक जीडीपीमध्ये चीनचा वाटा सुमारे 18.56 टक्के होता. म्हणजेच चिनी बाजारावर परिणाम झाला तर त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर होणार हे स्पष्ट आहे.

युनायटेड स्टेट्स स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांच्या म्हणण्यानुसार, देशाची अर्थव्यवस्था पाहता चीनची परिस्थिती ही जगासाठी चिंतेची बाब आहे. एकीकडे कोरोना, दुसरीकडे अर्थव्यवस्था आणि राजकीय स्पर्धा, चीन आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव, लोकशाही मूल्ये आणि मानवी हक्कांबाबत चीन भूमिका या सगळ्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होणार आहे.