Republic of Slowjamastan: जगाच्या पाठीवर अशा कैक व्यक्ती आहेत ज्यांनी या न त्या कारणानं अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत, बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. असाच एक माणूस सध्या भल्याभल्यांसाठी एक कमाल व्यक्ती ठरत आहे. कारण, या माणसानं स्वत:चाच एक देश तयार केला आहे..... झालात ना तुम्हीही थक्क? बसला ना धक्का?
सॅन डिएगोमधील एक डीजे आणि ब्रॉडकास्टर रँडी 'आर डब' विलियम्स यानं काही काळापूर्वीच स्वत:चा एक देशच बनवला. हा इसम जगभरात 'स्लोजामस्तानचा सुलतान' म्हणूनही ओळखला जातो. CNN च्या वृत्तानुसार विलियम्सनं त्याचं संपूर्ण आयुष्य जगातील विविध देशांची भटकंती करण्यात व्यतीत केलं. त्याची भटकंती अमर्याद होती आणि जेव्हा भटकंतीसाठी फक्त एक यूएन-मान्यता प्राप्त देश शिल्लक राहिला तेव्हा त्यानं एक जगावेगळा निर्णय घेतला.
स्वत:च्या रेडिओ शोच्या नावावरून त्यानं देश तयार करण्याचं ठरवलं आणि कॅलिफोर्नियातील वाळवंटात निर्मनुष्य भूखंडाचा 11.07 एकरांचा भाग खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सुटाबुटात तयार होऊन विलियम्सनं 1 डिसेंबर 2021 ला USA पासून या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. या नव्या देशाला नाव दिलं, स्लोजामस्तान.
नव्यानं आकारस आलेल्या या लोकशाही राष्ट्रामध्ये एका देशासाठी लागणारे सर्व गुणविशेष आहेत. या देशात स्वत:चा पासपोर्ट दिला जातो. त्यांचा वेगळा राष्ट्रध्वजही आहे. इतकंच नव्हे, तर या देशाचं चलन आणि राष्ट्रगीतही आहे. विलियम्सनं संयुक्त राष्ट्रांची मान्यात असणाऱ्या तुर्कमेनिस्तान या अखेरच्या राष्ट्रात गेला आणि तिथं 193 देशांनंतर आणखी एक देश असावा असं त्याला जाणवलं.
विलियम्स याचा हा स्वघोषित देश कॅलिफोर्निया स्टेट रुट 78 वर असणारा पीपल्स रिपब्लिक ऑफ स्लोजामस्तान नावानं ओळखला जाणारा वाळवंटीय भूखंडाचाच एक भाग आहे. या देशात, 'तुमचं स्लोजामस्तानात स्वागत आहे' असं म्हणणारे फलकही आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या देशासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूखंडाची किंमत आहे 19000 डॉलर. येत्या काळात या देशाचे इतर राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला जाईल असा मानस विलियम बाळगून आहे. विलियम्सच्या दाव्यानुसार हल्लीच्याच प्रवासानंतर त्याच्या पासपोर्टवर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वानूअतू, युएसए यांसह 16 इतर राष्ट्रांचीही मोहोर उमटली आहे. कमाल आहे ना?