नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयावर ट्रम्प झाले नाराज

त्या वाचनालयात जाणार कोण?

Updated: Jan 3, 2019, 04:45 PM IST
नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयावर ट्रम्प झाले नाराज title=

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तानला मदत करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. भारताकडून आर्थिक मदत घेऊन अफगाणिस्तानात वाचनालय उभारले जात आहे. मात्र, या वाचनालयाचा कोणताच फायदा होणार नाही, असा नाराजीचा सूर ट्रम्प यांनी लावला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी कायम देशी धोरणांचा पुरस्कार केला आहे. अमेरिकेतील उद्योजकांनी परदेशात गुंतवणूक करण्याऐवजी स्वदेशात गुंतवणूक करण्यावर ट्रम्प प्रशासनाकडून भर दिला जात आहे. 

या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानला मदत देण्याचा घेतलेला निर्णय ट्रम्प यांना फारसा रुचलेला नाही. अफगाणिस्तानात वाचनालय उभारून तिकडे कोण जाणार, हा प्रश्न मला पडल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. 

इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये पंतप्रधान मोदींनी ट्रम्पनाही टाकलं मागे

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराच्या ७००० तुकड्या माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तान सरकारने ट्रम्प प्रशासनाला हा निर्णय घेण्यापासून रोखण्याचा बराच प्रयत्न केला. अमेरिकन फौजा माघारी परतल्यास तालिबान आणि आयसिस या दहशतवादी संघटना पुन्हा उचल खातील, अशी भीती अफगाणिस्तानला आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान भारताकडून लष्करी सहाय्याची अपेक्षा करत असल्याचे दिसत आहे. यादृष्टीने अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहीब लवकरच भारत भेटीवर येणार आहेत. 

गेल्या काही वर्षांमध्ये भारताकडून अफगाणिस्तानच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात आर्थिक व लष्करी सहाय्य केले जात आहे. नुकतेच अफगाणिस्तान लष्करातील महिलांनी चेन्नई येथील अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले होते.