'कोरोना'चा धोका टाळण्यासाठी ट्रम्पचं कोकणी माणसाला नमस्ते

जगभरातल्या सगळ्या नेत्यांच्या भेटी सध्या नमस्कारानं सुरू होत आहेत. 

Updated: Mar 13, 2020, 08:47 PM IST
'कोरोना'चा धोका टाळण्यासाठी ट्रम्पचं कोकणी माणसाला नमस्ते title=

मुंबई : जगभरातल्या सगळ्या नेत्यांच्या भेटी सध्या नमस्कारानं सुरू होत आहेत. कोरोनामुळे सगळ्यांनी शेकहँड करणं सोडूनच दिलंय. आयर्लंडचे पंतप्रधान आणि अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एकमेकांना भेटले, तेव्हाही त्यांनी एकमेकांना नमस्कारच केला.

कोरोनाविरोधात सगळं जग मोठं युद्ध लढतंय. पटापट संक्रमित होणारा कोरोमा मोठं आव्हान ठरलंय. या संकटापासून वाचण्यासाठी आता अख्खं जग भारतीय परंपरांकडे वळलंय. जगभरातले नेते आता एकमेकांना भेटल्यावर शेकहँड करण्याऐवजी नमस्कार करु लागलेत. मग ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड़ ट्रम्प असो किंवा ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प भारतात आले होते. लाखो भारतीयांनी नमस्ते ट्रम्प म्हणत त्यांचं स्वागत केलं. या कार्यक्रमाचं नावच नमस्ते ट्रम्प ठेवण्यात आलं होतं. तेव्हा कदाचित ट्रम्प यांनाही माहीत नसेल, की हेच नमस्ते कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये सगळ्या जगाची साथ देणार आहे. सध्या वॉशिंग्टनमध्ये आलेले आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी ट्रम्प यांना नमस्कार केला. अर्थात लिओ वराडकर हे मूळचे भारतीयच, आपल्या कोकणातले. त्यांनी नमस्कार केल्यावर ट्रम्प यांनीही नमस्कार केला.

फ्रांसचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रॉनही नमस्कार करताना दिसले. राष्ट्रपति मैक्रॉन यांनी स्पेनचे राजा फिलिप आणि त्यांच्या पत्नीचं पॅरिसमध्ये स्वागत केलं. त्यावेळीही त्यांनी शेकहँड न करता नमस्कार केला. तर प्रिन्स चार्ल्स यांचाही नमस्तेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चार्ल्स आधी शेकहँड करायला जातात आणि मग नमस्कार करतात, असं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदींनीही नमस्ते करण्याचा सल्लाही दिलाय. कोरोनापासून बचावासाठी एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवा, असं जगभरातले तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळे आता सगळं जग या नमस्तेच्या प्रेमात पडलंय.