उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, पाहा काय आहे कारण?

समाजसुधारक, कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे औपचारिक अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

Updated: Sep 13, 2022, 02:46 PM IST
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियात दाखल, पाहा काय आहे कारण? title=

मॉस्को : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रशियामध्ये दाखल झाले आहेत. पुढील 2 दिवस ते रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या तैलचित्राचं 14 सप्टेंबरला मॉस्को (Moscow) या ठिकाणी अनावरण होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. त्यांच्या सोबत विधानसभेचे अध्यक्ष (Maharashtra Assembly speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे देखील रशियात दाखल झाले आहेत. 

 

समाजसुधारक, कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर रशियन क्रांतीचा मोठा प्रभाव होता. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि रशियातील लेनिनच्या नेतृत्वाखालील कामगार क्रांतीमुळे ते भारावून गेले. त्यांच्या साहित्यकृतीमध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा, रशियाचा माझा प्रवास आणि अनेक कथा आणि कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या आहेत.

“मॉस्को येथे मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमवेत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे अनावरण करणे हा माझा सन्मान आहे,” असे फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या युरेशियन स्टडीज विभागांतर्गत भारत-रशिया राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रशियामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 14 आणि 15 सप्टेंबर रोजी मॉस्को येथील रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी येथे होणार आहे. भारतातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेसह (ICCR) मुंबई विद्यापीठाने या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

इंडियन कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च (ICHR) चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे म्हणाले, "आज मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल प्रेम आणि आदर असलेल्या लोकांचा एक वर्ग आहे आणि रशियामध्ये त्यांच्या प्रतिमेचे उद्घाटन होत आहे, ही एक सन्मानाची गोष्ट आहे."