वॉशिंग्टन : कोरोनाच्या (Coronavirus) मोठ्या विळख्यात अडकलेल्या चीनला जागतिक बँकेकडून (World Bank) मोठा धक्का देणारी, चिंतादायक बाब समोर आली आहे. जागतिक बँकेचा अंदाज आहे की, यावर्षी जागतिक साथीच्या कोरोना विषाणूमुळे चीन आणि इतर पूर्व आशियाई देशांमधील अर्थव्यवस्थेची (Economy) गती अतिशय कमी होणार असून त्यामुळे लाखो लोक गरिबीकडे जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जागतिक बँकेने सोमवारी जाहीर केलेल्या एका अहवालात ही भीती व्यक्त केली आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी या क्षेत्राचा विकास दर 2.1 टक्के असू शकेल, जो 2019 मध्ये 5.8% होता.
बँकेचा अंदाज आहे की, 1.1 कोटीहून अधिक लोक गरिबी, दारिद्र्याच्या कक्षेत येऊ शकतात.
हा अंदाज पूर्वीच्या अंदाजापेक्षा वेगळा आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या अंदाजामध्ये, या वर्षी विकास दर पुरेसा असेल. 3.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्यावर येऊ शकत असल्याचं यापूर्वीच्या अंदाजात सांगण्यात आलं होतं.
या अहवालात, चीनचा विकास दरही मागील वर्षीच्या 6.1 टक्क्यांवरून घसरुन या वर्षी 2.3 टक्क्यांपर्यंत खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चीनसह अनेक देशांच्या अर्थव्यस्थेवर कोरोनामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट आहे. अनेक देश लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे संपूर्ण व्यवहार, देवणा-घेवाण ठप्प आहे. अनेक कंपन्या, कराखाने, फॅक्टरी बंद आहेत. याचा थेट परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर, अर्थकारणावर होत आहे. अनेक काम नसल्याने घरी बसण्याची वेळ आहे. कोरोनाच्या संपूर्ण परिस्थितीत अनेक कामगार, कर्मचाऱ्यांवर नोकरीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे.