नवी दिल्ली : भारत आणि आखाती देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आजही कायम आहेत. जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान असताना आखाती देशांकडून भारताला एक विनंती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी कुवेत, ओमान, बहरीन आणि सौदी अरबसह अनेक आखाती देशांनी, भारताकडे डॉक्टर आणि नर्सेस यांची टीम पाठवण्याची विनंती केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की, आखाती देशांना भारतासोबत असलेले संबंधी महत्त्वाचे वाटत असून त्यांना कोरोना व्हायरसच्या माहामारीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करायची आहे. तसंच भारताकडून या देशांना रमजान महिन्यात पुरेशा खाद्य पदार्थांचा पुरवठादेखील केला जात आहे, असंही ते म्हणाले.
या सर्व देशांच्या प्रमुख नेत्यांनी, तेथे राहणाऱ्या सर्व भारतीयांना शक्य तेवढी मदत केल्याबद्दलही भारताला सांगितलं आहे. त्याशिवाय, भारत या देशांमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर गेल्या काही आठवड्यांपासून आखाती देशांच्या संपर्कात आहेत. पंतप्रधानांनी आखाती देश सौदी अरब, यूएई, कतार, कुवेत, बहरिन, ओमान यांसारख्या देशातील प्रमुख नेत्यांशी फोनवरुन चर्चादेखील केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारत आणि आखाती देशांमधील संबंधांवर निशाणा साधत काही फेक ट्विट करण्यात आले होते. या ट्विटवर टीका करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, भारत आणि आखाती देशांचे संबंध मजबूत आहेत. त्यामुळे भारत आणि आखाती देशांतील संबंधांचं वर्णन अशा प्रकारच्या ट्विटद्वारे केलं जाऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं होतं.