तेहरान : चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसच्या संसर्गामुळे जगातील अनेक देशात हाहाकार माजला आहे. कोरोनाचा कहर ईराणमध्येही सुरुच आहे. कोरोना व्हायरसमुळे ईराणमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3800वर गेली आहे. अतिशय भयानक परिस्थिती असताना, ईराणमधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या घटनेत 600हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 3000हून अधिक लोकांची स्थिती गंभीर आहे.
इराणचे प्रवक्ते गुलाम हुसैन इस्माईली यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफवांवर विश्वास ठेऊन कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी, त्यावरील उपाय म्हणून लोकांनी विषारी दारुचं सेवन केलं. या विषारी दारुमुळे 600हून अधिकांचा बळी गेला आहे. 3000हून अधिक लोकांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इस्माईली यांनी मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
इस्माईली यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरससाठी दारुचं सेवन करणं हा उपाय नाही. हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. अशा प्रकारच्या अफवेमुळे इतक्या मोठ्या संख्येत लोकांचा मृत्यू होण्याची कल्पनाही नसल्याचं ते म्हणाले. याप्रकरणी दोषी असलेल्या अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या लोकांवर गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ईराणच्या 31 संसदीय सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संसद बंद करण्यात आलं. परंतु मंगळवारी पुन्हा संसदेचं कामकाज सुरु करण्यात आलं. चीननंतर अमेरिका, ईराणमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ईराणमध्ये 62 हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.