Corona New Varient : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) विस्फोट झाला आहे. आयफोन (iPhone) उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेनान प्रांताची राजधानी झेंगझोऊमध्ये (Zhengzhou) कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप पाहिला मिळतोय. त्यामुळे या परिसरात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे.
Covid Zero पॉलिसी अंतर्गत लॉकडाऊन
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. चीनच्या कोविड झिरो (Covid Zero) धोरणांतर्गत जिथे जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत तिथे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आयफोनची निर्माती कंपनी फॉक्सकॉन टेक्नोलॉजीचा (Foxconn Technology) प्लांट याच ठिकाणी आहे.
कोरोना चाचणी अनिवार्य
मिळालेल्या माहितीनुसार झेंगझोऊमधील सुमारे 10 लाख लोकांना सोमवारपासून घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना चाचणी केल्यानंतरच इथल्या लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. या लॉकडाऊन अंतर्गत अत्यावश्यक नसलेले व्यवसाय बंद करण्यात आल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे. चीन सरकारकडून कोविड शून्य धोरणात कोणताही बदल न करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा परिणाम
हेनान प्रांतातील झेंगझोऊ या मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोनाचे सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 9 ऑक्टोबरला इथली एकूण कोरोना रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली होती. याशिवाय, बीजिंगमध्ये 13 आणि शांघायमध्ये 32 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चीनमध्ये कोरोनाचे 697 सक्रिय रुग्ण आहेत. येथे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोविड शून्य धोरणाअंतर्गत सरकारला कोरोनाबाबत कोणताही हलगर्जीपणा बाळगायचा नाही.
चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का
चीनमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. यापूर्वी आलेल्या अहवालानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. 2022 मध्ये चीनचा आर्थिक विकास दर 3.2 टक्के असेल, तर 2023 साठी 4.4 टक्के विकास दराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर कोरोनाची प्रकरणे वाढली तर चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी हे मोठे संकट असेल.