Corona cases: भारताने ब्राझीलला टाकलं मागे, भारतीयांसाठी धोक्याची घंटा

भारतात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 5, 2021, 06:45 PM IST
Corona cases: भारताने ब्राझीलला टाकलं मागे, भारतीयांसाठी धोक्याची घंटा title=

मुंबई : भारतात कोरोना संसर्गाचा वेग वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांत देशात एक लाखाहून अधिक नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एकाच दिवसात कोरोना रुग्णांची ही संख्या सर्वात जास्त आहे. जागतिक मंचावर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. 

8 जानेवारी रोजी अमेरिकेत एकाच दिवसात तीन लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 25 मार्च रोजी ब्राझीलमध्ये एका दिवसात 100,158 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 2,777 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकाच दिवसात कोरोनाचे 1,03,844 नवीन रुग्ण वाढले आहेत. भारताने यानुसार ब्राझीलचा रेकॉर्ड मोडला आहे.

जगातील कोरोना मीटरनुसार अमेरिकेत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31,420,331 आहे. तर 5,68,777 मृत्यूची नोंद आहे. ब्राझील हा याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणाची संख्या 12,984,956 वर गेली आहे. ज्यात 3,31,530 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाची संसर्गाची संख्या 12,589,067 इतकी आहे. ज्यात 165,132 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या 1,03,844 ने वाढली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, साथीच्या रोगाचा प्रसार महाराष्ट्रात झपाट्याने होत आहे, जिथे विक्रमी 57,074 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ही महाराष्ट्रात एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे.

महाराष्ट्रात परिस्थिती बिकट होत चालली आहे. अनेकांना अजूनही याचं गांभीर्य दिसत नाही. कोरोना रुग्णांना बेड मिळणं कठीण होत चाललं आहे. जर कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर आरोग्य विभागावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. लोकांनी अजूनही गांभीर्य ओळखलं नाही तर राज्यात मेडिकल इमरजन्सीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही अधिक वेगाने पसरत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कोरोना रुग्णांची वाढ ही या वर्षी अधिक झपाट्याने होत आहे. लोकं अजूनही नियम पाळतांना दिसत नाहीयेत. ज्यामुळे त्यांच्या बरोबर ते इतरांना ही इन्फेक्ट करत असल्याचं पुढं आलं आहे.