Israel-Hamas War : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूचे 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा हमासने केलेल्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायली सैन्याने गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही हमासच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलने हमाससोबतच्या संघर्षांदरम्यान दक्षिण गाझामधील खान युनिस आणि रफाह येथे मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली आहे. मात्र गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की इस्रायलने एका रुग्णालयावर हल्ला केला असून त्यात पाचशे लोक ठार झाले आहेत. इस्रायलने हा आरोप फेटाळून लावत हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या दहशतवादी गटाने केलेल्या रॉकेट प्रक्षेपणामुळे हॉस्पिटलवर हल्ला झाला. आयडीएफचा यात कोणताही सहभाग नाही. मात्र, रुग्णालयावरील या हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापासून ते संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने याचा निषेध केला आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गाझा शहरातील हॉस्पिटलवर इस्रायली हवाई हल्ल्यात किमान 500 लोक ठार झाले आहेत. हल्ल्याच्या वेळी शेकडो लोक अल-अहली रुग्णालयात होते. 'द असोसिएटेड प्रेस'ने पाठवलेल्या फोटोंमध्ये हॉस्पिटलच्या हॉलमध्ये आग, तुटलेल्या काचा आणि मृतदेह दिसत होते. ही माहिती जगभरात पसरल्यानंतर खळबळ उडाली आहे.
A massacre: hundreds are killed in an Israeli strike on the Episcopal (Anglican) Church hospital (Al Ahli Arab Hospital) in #Gaza, there were hundreds of medical staff, patients and civilians taking refuge under Church protection. What and how long will it take to stop these… pic.twitter.com/oc3wSHwRTO
— Husam Zomlot (@hzomlot) October 17, 2023
इस्रायलचे प्रत्युत्तर
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन म्हणाले की, गाझामधील रानटी हल्ला इस्रायली लष्कराने नव्हे तर दहशतवाद्यांनी केला हे संपूर्ण जगाला कळले पाहिजे. ज्या लोकांनी आमच्या मुलांना क्रूरपणे मारले, ते स्वतःच्या मुलांनाही मारतात. यापूर्वी माहिती देताना आयडीएफने हॉस्पिटलवरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार असल्याचे म्हटले होते. आयडीएफने म्हटले आहे की, हमासने इस्रायलवर अनेक रॉकेट सोडले होते, ज्यापैकी एक अयशस्वी झाला आणि त्याने गाझामधील रुग्णालयाला लक्ष्य केले. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध गुप्तचर माहितीनुसार, रुग्णालयावरील या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटना जबाबदार आहे.