पेईचिंग : चीनमधून भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलण्यासाठी तसंच १००० किलोमीटर लांब सुरुंग बनवण्याच्या सर्व बातम्या निराधार असल्याचं चीननं म्हटलंय.
चीननं आपल्या शिनजियांग प्रांतातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचवण्यासाठी १००० किलोमीटर लांब सुरुंग बनवून ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी दुसरीकडे वळवण्याच्या बातम्या भारतीय मीडियात आल्या होत्या.
चीनचे परदेश मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी मीडियाला सामोरं जात, या सर्व बातम्या निराधार असल्याचं म्हटलं. सीमेपलिकडे नदीच्या पाण्याचा सहयोग कायम राहील, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
हाँगकाँगची साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं सोमवारी, चीनचे इंजिनिअर जगातील सर्वात लांब सुरुंग बनवण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करत असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाही तर, तिबेटच्या संगिरी भागातून शिनजियांग प्रांतातील दुष्काळग्रस्त ताकलामाकनपर्यंत नदीचं पाणी पोहचवलं जाईल... मार्च २०१८ पर्यंत हा प्लान पुढे रेटला जाईल... असं साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं म्हटलं होतं.