Super Cows: China ने Cloning करत तयार केल्या 3 'सुपर गाई', एका वर्षात देणार तब्बल 17 हजार 500 लीटर दूध

Cloned Super Cows: भारताचा शेजारी देश चीनने (China) क्लोनिंग तंत्रज्ञानाच्या (Cloning Technology) सहाय्याने तीन सुपर गाई तयार केल्या आहेत, ज्या एका वर्षात 17 हजार 500 लीटरपर्यंत दूध (Milk) देऊ शकतात. चीन अशा 1000 गाई तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.   

Updated: Feb 3, 2023, 08:37 AM IST
Super Cows: China ने Cloning करत तयार केल्या 3 'सुपर गाई', एका वर्षात देणार तब्बल 17 हजार 500 लीटर दूध title=

Chinese Super Cows: भारताचा शेजारी देश चीन (China) नेहमीच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळे प्रयोग करत असतो. यादरम्यान आता चीनने एक नवा दावा केला आहे. Cloning च्या सहाय्याने आपण अशा तीन सुपर गाई (China Super Cows) तयार केल्या आहेत, ज्या वर्षाला 17 हजार 500 लीटर दूध देऊ शकतात असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ब्रिटनमधील गाईंच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. तिथे एक गाय वर्षाला 8000 लीटरपर्यंत दूध देते. चिनी माध्यमांनी गाईंच्या प्रजननाचा हा प्रयोग दुधाची आयात कमी करणारं असल्याचं म्हटलं आहे. 

एक हजार गाई तयार करण्याचा मानस

ब्रिटिश वेबसाईट 'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या माध्यमातून अशा 1000 सुपर गाई तयार करण्याचा चीनचा मानस आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीन जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश ठरु शकतो. सर्वाधिक दूध उत्पादन क्षमतेमुळे चीनमध्ये दुधाचा पुरवठा वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यात आणि निर्यात करण्यास मदत होईल. या प्रोजेक्टचं नेतृत्व करणाऱ्या Jin Yaping यांनी सांगितलं आहे की, गायींच्या कानाजवळील टिश्यू घेऊन भ्रूण तयार केलं आहे. त्यानंतर 120 गायींमध्ये त्या भ्रूणांचे प्रत्यारोपण करण्यात आले.

प्रयोग 42 टक्के यशस्वी

Jin Yaping यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आलं, त्यातील 42 टक्के गर्भवती झाल्या आहेत. सध्या अशा तीन गाईंचा जन्म झाला आहे. 17.5 टक्के गाईंचा जन्म पुढील काही दिवसांत होणार आहे. 

हायब्रीड गाईंची संख्या वाढवण्याची तयारी

Jin Yaping यांनी सांगितलं आहे की, जोपर्यंत हे तंत्रज्ञान व्यावसायाशी जोडलं जात नाही आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत नाही तोवर त्याला काही अर्थ नाही. यामुळे क्लोनिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे. यामुळे कमी दूध देणाऱ्या गाईंच्या गर्भात हायब्रीड भ्रूण प्रत्यारोपण करत सुपर गाईंची संख्या वाढवली जात आहे. ज्यामुळे अशा गाईंची संख्या वेगाने वाढवत दूधाचं उत्पादनही वाढवलं जाईल.

चीनमध्ये सध्या 66 लाख गाई

चिनी वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लोनच्या माध्यमातून जन्मलेल्या गाईंचे टिश्यू जतन केले जातील, ज्यामुळे जास्तीत जास्त सुपर गाईंना जन्म देण्यास मदत होईल. चीनमध्ये सध्या 66 लाख गाई आहेत. यामधील जवळपास 70 टक्के गाई विदेशातून आयात करण्यात आल्या आहेत. जर चीन 1000 सुपर गाई तयार करण्यात यशस्वी झाला तर दरवर्षी 1800 टन दूधाचं उत्पादन होईल.